![]()
अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या रविवारी पार पडलेल्या शेवटच्या आमसभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांना बँकेचे सभासद करून घेण्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात आला. त्याचबरोबर, मृत कल्याण निधीची रक्कम २० लाखांवरून ३० लाखांपर्यंत वाढवण्याचा आणि त्यासाठी मासिक कपात एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या संचालक मंडळाची ही शेवटची आमसभा अमरावती येथील अंशुमन पॅलेसमध्ये पार पडली. या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद झाले, मात्र नेहमीप्रमाणे मोठा गदारोळ दिसला नाही. शेवटची सभा असल्याने विरोधकांनीही संयम राखला. मृत कल्याण निधीच्या लाभासाठी वयोमर्यादेचा मुद्दा बराच काळ चर्चेत राहिला. निवृत्त सभासदांनी वयोमर्यादा ७० वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, यामुळे मासिक कपातीचा भार वाढेल आणि इतर कारणांमुळे बहुसंख्य सदस्यांनी हा प्रस्ताव नाकारला. अखेरीस, वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच ही योजना लागू ठेवण्यावर एकमत झाले. या वयोमर्यादेत सदस्याचा मृत्यू झाल्यासच त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळेल. यापूर्वी, बँकेची सभासद संख्या वाढवण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील महसूल कर्मचाऱ्यांना बँकेचे सभासदत्व देण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. परंतु, या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी विरोध दर्शवला. भविष्यात महसूल कर्मचाऱ्यांचे प्राबल्य वाढून बँकेच्या नावातून ‘शिक्षक’ हा शब्द वगळला जाण्याची भीती बहुसंख्य सदस्यांनी व्यक्त केली. यावर पर्याय म्हणून, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील शिक्षकांना सभासदत्व देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. याशिवाय, बँकेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विषय, कर्जावरील व्याजदर, लाभांश, मुख्यालय इमारतीचे बांधकाम, बुलढाणा शाखा सुरू करणे, संचालक मंडळाची संख्या वाढवणे आणि उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. सभेच्या शेवटी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. चर्चेदरम्यान पंकज गुल्हाने, सुनील कुकडे, प्रफुल्ल भोरे, प्रभाकर झोड, सुनील केणे, वसीम फरहत, गौरव काळे, पारडे गुरुजी आणि शिक्षक कोकाटे यांनी प्रश्न विचारले. मंचावर उपस्थित अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी संचालक मंडळाच्या वतीने त्यांना उत्तरे दिली. यावेळी उपाध्यक्ष सुरेन्द्र मेटे, संचालक तुळशिदास धांडे, प्रफुल्ल शेंडे, मो. नाजीम अ. गप्फार, कैलास कडू, उमेश चुनकीकर, अजयानंद पवार, रामदास कडू, राजेन्द्र गावंडे, मनिष काळे, विजय कोठाळे, संभाजी रेवाळे, राजेश गाडे, सरीता काठोळे, संगिता तडस, तज्ज्ञ संचालक ॲड. राजपाल वानखडे, ॲड. मो. शकील अहमद, मो. गयास आणि सरव्यवस्थापक संजय साळवे उपस्थित होते.
Source link
महसूल कर्मचाऱ्यांना नो एंट्री, मृत कल्याण निधी ३० लाखांवर:शिक्षक बँकेची शेवटची आमसभा वादळी वातावरणात पार पडली