Headlines

खरगे यांच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण, काँग्रेसकडून निषेध:उत्तराखंडमधील घटनेवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या सभेनंतर, काही धर्मांध शक्तींनी त्या मंचाचे शुद्धीकरण केले. या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, हे केवळ खरगे यांचा नव्हे, तर एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना निवेदन सादर करून केली. निवेदनात म्हटले आहे की, खरगे दलित असल्यामुळेच मंचाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आले. स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही देशात मनुवादी विचारसरणी जिवंत असल्याचा हा पुरावा आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली असून, समाजमन विचारमग्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशात समतेचा विचार रुजवला असताना, या दुर्दैवी घटनेने समतेच्या विचाराला डाग लागला आहे. स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षांनंतरही अशा घटना घडत असतील, तर आपण प्रगतीऐवजी मागे जात आहोत, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी महापौर अशोक डोंगरे, ॲड. पी.एस खडसे, डॉ. बी.आर. देशमुख, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रा.डॉ. सुजाता झाडे, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ, प्रा. अनिल देशमुख, भैय्यासाहेब निचळ, अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख, राजाभाऊ चौधरी, माजी नगरसेवक विजय वानखडे, गोपाल धर्माळे, अविनाश मेश्राम, आशिष यादव, प्रियल मोहोड, धनंजय बोबडे, कुणाल गावंडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी दानेज यांच्याशी बोलताना किशोर बोरकर यांनी खेद व्यक्त केला की, आजच्या आधुनिक काळातही अशी जातीयवादी विचारसरणी इतकी मजबूतपणे जिवंत आहे, हे आपल्या सर्वांचेच अपयश आहे. अशा घटनांमुळे मानवतेला काळीमा फासली जाते आणि त्यातून खोलवर वेदना होतात, असेही बोरकर म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *