Headlines

साखरपुडा केला, 2.60 लाख उकळले:नवरी मात्र अल्पवयीन‌!




विवाहाचे स्थळ दाखवून घरगुती साखरपुडा केला, लग्नाची तारीखही निश्चित केली आणि त्यानंतर मुलीच्या आजीच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून तब्बल २ लाख ६० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात समोर आली आहे. विशेष म्हणजे, पोलिस तपासात नवरी मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन असल्याचे तसेच तिच्यासोबत आलेले आई, मावशी व भाऊ म्हणून सांगितलेले व्यक्ती तिचे नातेवाईक नसल्याचे निष्पन्न झाले. श्रीरामपूर येथील एका व्यक्तिच्या भावाच्या विवाहासाठी हे स्थळ दाखवण्यात आले होते. विवाहासाठी मुलगी, तिची आई व इतर नातेवाईक असल्याचे सांगत काही जण श्रीरामपुरात आले. मुलगा-मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच घरगुती साखरपुडाही करण्यात आला. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी लग्न करण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, मुलीच्या आजीची प्रकृती गंभीर असून तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगत तातडीच्या उपचारांसाठी अडीच लाख रुपयांची मदत मागण्यात आली. त्यानुसार एका पुरुष व एका महिलेकडे २ लाख ६० हजार रुपये रोख देण्यात आले. मात्र दोन दिवसांनी मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलताना आपण येथून गुपचूप निघून जाणार असल्याचे सांगत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. विचारणा केली असता तिने आपल्याला लग्न करायचे नसून आधारकार्ड व टीसी आणण्यासाठी घरी जायचे असल्याचे सांगितले. यानंतर पैसे परत मागितल्यावर संबंधित पुरुषाने ६० हजार रुपये परत केले; उर्वरित पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी तुम्ही व मुलीचे नातेवाईक पाहुन घ्या असे त्या व्यक्तिने श्रीरामपुरात भावी नवरदेवाच्या घरच्यांना कळवले. तेव्हा नवरदेवाकडच्यांनी संबंधित महिलेला फोन करुन पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार देऊन मुलीचे अपहरण केले म्हणून आमच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पाच महिला व एक पुरुष (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई अप्पासाहेब हंडाळ करीत आहेत. नवरी १७ वर्षांची; आई, मावशी,भाऊ म्हणून आलेलेही बनावट सखोल चौकशीत नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. तिने आपले खरे नावही पोलिसांना सांगितले. तिच्यासोबत आई, मावशी व भाऊ म्हणून आलेले व्यक्ती तिचे नातेवाईक नसल्याचेही उघड झाले. पैशांची गरज असल्याने आशाबाई हजारे व मच्छिंद्र पुंड यांच्या मदतीने साखरपुडा करून त्याबदल्यात पैसे घेण्याचा डाव आखल्याची माहिती मुलीने दिली. पैसे मिळाल्यानंतर दोन दिवसांनी आपण घरी निघून जाणार होतो, असेही तिने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *