![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात केलेल्या विधानाने जिल्ह्यात नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे, अशी उघड इच्छा गोरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच, शिवेंद्रराजे आणि आपले अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध असून, आम्ही दोघांनी मिळून या जिल्ह्याची जबाबदारी आणि पालकत्व सांभाळल्यास त्याला आपली कोणतीही हरकत नसल्याचेही गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले. महत्त्वाची खाती असणे ही मोठी राजकीय ताकद असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केले आहे. 2025 च्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे लातूरचे, तर जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले होते. तसेच साताऱ्याची जबाबदारी सध्या मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. अशा परिस्थितीत गोरे यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे साताऱ्याच्या पालकमंत्रिपदात बदल होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांचे पालकमंत्रिपद बदलण्याची थेट मागणी केली नसली तरी, या सूचक विधानावरून गोरे आणि देसाई यांच्यात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादावर अद्यापही पडदा पडलेला नाही, हेच स्पष्टपणे दिसून येत आहे. गोरे बंधूंमधील रंगतदार लढत आणि राजकीय आव्हान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला असून, मतदारांच्या ठरावाचे काम पूर्ण झाले आहे. या निवडणुकीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच, विद्यमान संचालक शेखर गोरे यांनीही पुन्हा एकदा बँकेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शेखर गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरण्याची ठाम भूमिका घेतल्याने, आगामी काळात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले असून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या नियमांचा दिग्गजांना फटका आणि भाजपची रणनीती सातारा जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने जिल्हा बँकही ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. मात्र, बँकिंग क्षेत्रातील नव्या नियमांमुळे या निवडणुकीत मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. या नव्या नियमांचा थेट फटका मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल दहा दिग्गज नेत्यांना बसणार असून त्यांचा पत्ता कट होणार आहे. परिणामी, या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील या नेत्यांना जिल्हा बँकेत महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.
Source link
'शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे':मंत्री जयकुमार गोरेंची बोलून दाखवली इच्छा, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण