![]()
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड व मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार असल्याचा मोठा दावा केला होता. या विधानाची चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही एकनाथ शिंदे हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांनी त्यांचा हा प्रवेश होऊ दिला नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. दलवाई यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, आता या नव्या दाव्यावर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हुसेन दलवाई यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता, हा नवीन विषय असल्याचे सांगत माजी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. यावर अधिक भाष्य करताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती. मात्र काय झाली ते सांगणार नाही. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत ते आमचे काम करत नाहीत मात्र आजही आमचे मित्र आहेत ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या मात्र त्यावर मी बोलणार नाही, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले. गोपीनाथ मुंडेंबाबत के म्हणाले चव्हाण? भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या विषयावर अधिक माहिती देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 13 ऑक्टोबरला गोपीनाथ मुंडे आणि माझी भेट झाली होती. त्यानंतर 18 ऑक्टोबरला मी दिल्लीत गेलो होतो, त्यावेळी कुठलाही कार्यक्रम नव्हता फक्त हाच विषय दिल्लीत होता.याला साक्षीदार माणिकराव ठाकरे आहेत. गोपीनाथ मुंडेंबाबतचा एकच प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली होती. ‘नागपूरमधले दोघेजण मला खूप त्रास देतील’ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठी सकारात्मक असल्याचे सांगताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये मुंडे साहेब हे उपनेते होते, त्यावेळी सोनिया गांधी आणि सर्वांनाच हे पटलेलं होतं.आमच्या भागातील सर्वात मोठा ओबीसी नेता आहे असं सांगितले होते. हा इतिहास आहे. गोपीनाथ मुंडे मोठे राजकीय नेते होते म्हणून मी आता बोललो.याच्या आधीही मी बोललो होतो मात्र कोणीही हा विषय पिकअप केला नव्हता. पक्षामध्ये या असं त्यांना म्हटलं मात्र ते म्हटले की तसं जर प्रवेश केला तर मला निवडून येणं अवघड होईलं. नागपुरमधले दोघेजण मला खूप त्रास देतील असेही गोपीनाथ मुंडे मला म्हटले होते.
Source link
'एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये येणार होते':हुसेन दलवाईंचा दावा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- आमची चर्चा झाली, पण काय ते सांगणार नाही