Headlines

लिंबाळा मक्ता जि. प. शाळेचे मुख्याध्यापक निलंबित:मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आदेश, शिक्षण विभागाकडून होता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न




हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी ता. १७ काढले आहेत. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कटके हे मद्यपान करून शाळेत येतात, विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत तसेच गावातील व्यक्तींना विनापरवानगी शाळेत शिकविण्यास सांगतात. तसेच, दुपारी तीन वाजल्यानंतर शाळा भरवत नाहीत तर शाळेत विद्यार्थी गेल्यास त्यांना हाकलून लावत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी ता. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांना एप्रिल महिन्यात नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. या सोबतच हिंगोली पंचायत समिती कार्यालयास तातडीने शाळेला भेट देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकारानंतर पुढे शिक्षण विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला होता. दरम्यान, काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी गावकरी व विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला होता. यावरून दिपके यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याध्यापक कटके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. यावरून मुख्याध्यापक कटके यांना निंलबित करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *