![]()
पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून पुन्हा एकवेळ पंढरपूर तालुक्यातील दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या समोर पंढरपूर तालुक्यातील दोन उमेदवार असणार आहेत. याशिवाय शिंदे सेनेकडून मंगेश चिवटे या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी ५१,६१२ मतदारांची नोंदणी ११ ऑगस्टअखेर झालेली आहे. सप्टेंबरअखेर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्याचा हा मतदार संघ आहे. या मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीकडून सावंत यांनी मागील पाच वर्षांपासून सातत्याने शिक्षकांच्या आणि शाळांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. दुसऱ्या बाजूला स्वेरी शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. वर्षभर गुप्तपणे तयारी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून डॉ. रोंगे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवणे, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, आदर्श शाळा यांना विविध पुरस्कार देणे सुरू आहे. डॉ. रोंगे यांनी यंत्रणा नेटाने कामाला लागलेली आहे. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीकडून दत्तात्रय सावंत यांनी २० वर्षांपासून या मतदार संघात काम केलेले आहे. त्यामुळे सावंत यांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपकडून त्यांना उमेदवारीची विचारणा केल्याचे सांगितले जात आहे. प्रा. सावंत यांनी या संदर्भात अद्याप काही भाष्य केलेले नाही, परंतु तशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मागील निवडणुकीत मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष, पंढरपूरचे प्रा. सुभाष माने हे तिसरे उमेदवार होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतविभागणी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा लाभ प्रा. आसगावकर यांना झाला. यावेळी प्रा. सावंत यांच्या विरोधात भाजपकडून प्रा. डॉ. रोंगे याना उमेदवारी मिळाली तर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातून मतविभागणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आ. जयंत आसगावकर, दत्तात्रय सावंत, डॉ. बी. पी. रोंगे यांच्याशिवाय भाजपकडून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे (सांगली), भाजप शिक्षक आघाडीचे संयोजक प्रशम कोल्हे (पुणे), शिवसेना (एकनाथ शिंदे) कडून मंगेश चिवटे (करमाळा), महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनीही निवडणुकीसाठी आपापल्या परीने तयारी केल्याचे दिसून येत आहे.
Source link
"पुणे शिक्षक''साठी पंढरीतील दोन तुल्यबळांचा "अभ्यास'':माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि स्वेरीचे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांची तयारी