![]()
“ज्या क्षेत्रामध्ये लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला आणि त्याला सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली, तिथे कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. सरकारे 5, 10 किंवा 15 वर्षांत बदलतात, मात्र मांजरा परिवाराचे हे विश्वासाचे सरकार गेल्या 50 वर्षांत बदललेले नाही आणि पुढची 50 वर्षेही ते बदलणार नाही,” असे खणखणीत प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेस नेते अमित विलासराव देशमुख यांनी केले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद आणि मांजरा परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणाले की, ‘ज्या क्षेत्रामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं कर्तृत्व आलं, तिथं मागे वळून पाहण्याची गरज कधी भासली नाही हे तुम्ही उघड्या डोळ्यानं गेली 50 वर्ष पाहताय. सरकार सुद्धा पाच वर्षात बदलतं. 10 वर्षात, 15 वर्षात सरकारं बदलतात. पण हे सरकार… हे 50 वर्ष बदललेलं नाही आणि पुढची 50 वर्ष बदलणार नाही. आपण उगाच चर्चा करतो हृतिक रोशन, सलमान खान, आमीर खान, शाहरुख खान, रितेश देशमुख… उगाच चर्चा करतो. चित्रपटांचे हे सारे हिरो यांच्यासमोर आहेत झिरो. आपल्यासाठी हिरो कोण? धीरजनी सांगितलं की नाही अडचणीत जो धावून येईल… अडचणीमध्ये जो मदतीला येईल तोच आपला हिरो.’ अमित देशमुख पुढे म्हणाले की, ‘आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील… यांच्याकडे पाहूनच तर हा तालुका, हा जिल्हा, हे शहर चाललंय. म्हणजे आज लातूरचे महापौर सुद्धा मांजरा पट्ट्यातले आहेत. जेवळी… लातूरचे महापौर. हे सगळं आज तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं, प्रेमानं, विश्वासाने हे सगळं चाललेलं आहे. आणखी आपल्याला खूप पुढं जायचंय. आव्हानं खूप आहेत, परीक्षा खूप आहेत. त्या सगळ्या आव्हानांना तोंड देत, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आपल्याला दमदार पाऊलं या पुढच्या काळामध्ये टाकायची आहेत आणि आज पुन्हा एकदा निश्चय आपण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत.’
Source link
चित्रपटांचे हिरो विलासरावांसमोर झिरो:काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे खणखणीत भाषण, म्हणाले- 'मांजरा' सरकार पुढची 50 वर्षे बदलणार नाही!