![]()
दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. पवार यांच्या हस्ते बुधवारी (१९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, गोरक्षनाथ सपकाळे, महेश पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, महावितरणच्या प्रत्येक तांत्रिक कर्मचाऱ्याचा जीव अनमोल आहे. अपघात झाल्यास कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने कामाच्या वेळी सुरक्षा साधने कटाक्षाने वापरावीत. त्यासाठी सांघिक कार्यालयाने केंद्रीय स्तरावर खरेदी करून सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुरक्षा साहित्य पुरवले आहे. त्याचा उपयोग करा आणि ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी कटिबद्ध राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पवार यांनी दोन्ही मंडलातील मानव संसाधन विभागाची सविस्तर आढावा बैठक घेतली. मानव संसाधन विभागाने व्यवस्थापनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासोबतच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित दावे, पदोन्नती पॅनल्स आणि शिस्तभंग कारवाईशी संबंधित प्रकरणांचा निर्धारित वेळेत आणि वेगाने निपटारा करण्याची सूचनाही पवार यांनी आढावा बैठकीत दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते दिवंगत कर्मचाऱ्यांच्या ६ अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची पत्रे देण्यात आली. संचालक (मानव संसाधन) यांचे तांत्रिक सहायक डॉ.संतोष पाटणी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडली. बैठकीस सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, शंकर कुलकर्णी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत, कार्यकारी अभियंते गिरीश गायकवाड, प्रेरणा बनकर, प्रसाद महातोले, महेंद्र देशमुख, अविनाश राऊत, रमेश वाघचौरे, विनय घनबहादूर, अशोक जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक स्वाती चव्हाण-गाडेकर, व्यवस्थापक संजय खाडे, बापू शिंदे, उपव्यवस्थापक भगवान जारे, तुषार भोसले, जयंत दिवाण, गणेश डांगे, प्रकाश जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. व्यवस्थापक डॉ.शिवाजी तिकांडे यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी पोतलवाड यांनी परिचय करून दिला. तर जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. यावेळी ज्योती तोगे, अभय एरंडे, विशाल घायाळ या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. जनमित्रांसह कर्मचाऱ्यांसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी राबवलेल्या विविध योजना व उपक्रमांबद्दल तंत्रज्ञ वैभव साखरे यांनी आभार मानले. तसेच सांघिक कार्यालयाने दिलेल्या सुरक्षा साधनांचा नियमित वापर करून अपघातमुक्त कामकाज करण्याचा संकल्प केला.
Source link
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन