राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तब्बल ९ नगरसेवक आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे एकूण
.
या पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व ९ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याने हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी स्थानिक पातळीवरील मोठा धक्का मानला जात आहे.
कळंबमध्ये ठाकरे गटाचा पूर्ण गटच भाजपमध्ये
कळंब नगरपरिषदेत सध्या शिवसेना शिंदे गटाचे ४, भाजपचे ६, शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे संख्याबळ आहे. मात्र, ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा १ नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास नगरपरिषदेतील सत्तेचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.
ठाकरे गटाच्या ९ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवक निवडून आलेले असून एका स्वीकृत नगरसेवकाचाही या पक्षप्रवेशात समावेश असल्याची माहिती आहे. गटनेत्यासह संपूर्ण गटच भाजपमध्ये जाणार असल्याने कळंबच्या राजकारणात या पक्षांतराचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे सर्व नगरसेवक शिवसेना शिंदे गटात न जाता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवरील बैठकीला नगरसेवक गैरहजर; त्याचवेळी पक्षांतराच्या चर्चांना उधाण
या संभाव्य पक्षांतराची कुणकुण काही दिवसांपासूनच राजकीय वर्तुळात सुरू होती. धाराशिवमधील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढवल्याची चर्चा होती. कळंबमधील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्याचेही समोर आले होते. त्यामुळे हे नगरसेवक पक्षांतर करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, कळंबमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मातोश्रीवरील बैठकीला हे नगरसेवक उपस्थित न राहिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. त्यानंतर आता या सर्व नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कैलास पाटील यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का
कळंब हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील ठाकरे गटाचे नगरसेवक एकाचवेळी भाजपमध्ये जाणे हा कैलास पाटील यांच्यासाठीही मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे आणि स्थानिक नेतृत्वासमोर आहे. त्यातच आता कळंबमधील संपूर्ण नगरसेवकांचा गट भाजपमध्ये जाणार असल्याने या पक्षांतराचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन टायगर’नंतर दुसऱ्या टप्प्याची चर्चा
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या महायुतीतील प्रवेशाचे सत्र सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसला आहे. काही काळापूर्वी झालेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे लोकसभेत केवळ तीन खासदार उरले आहेत. या धक्क्यातून पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरही पक्षाला गळतीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’च्या दुसऱ्या टप्प्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. “कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील,” असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर धाराशिवच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. आता कळंबमधील ठाकरे गटाच्या ९ नगरसेवकांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.
कळंबच्या सत्तेचे गणित बदलणार
आज होणाऱ्या पक्षप्रवेशानंतर कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा १ नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास भाजपचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता आणि आगामी राजकीय निर्णयांवर भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट आणि स्थानिक आमदार कैलास पाटील यांची पुढील रणनीती काय असेल, तसेच या पक्षांतराचे धाराशिव जिल्ह्यातील आगामी राजकारणावर किती परिणाम होतील, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” असा आक्रमक इशारा अमित ठाकरे यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी