![]()
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या झालेल्या नियुक्तीचे त्यांनी स्वागत केले, तर इस्कॉन मंदिराच्या अध्यक्षांनी केलेल्या एका विधानावर त्यांनी आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले. गिरीश महाजनांना आमचे पूर्ण सहकार्य! गेल्या १९ महिन्यांपासून रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, “गिरीश महाजन आधीपासूनच मंत्री होते, आता त्यांना पालकमंत्री पद दिल्याने ते आणखी चांगले काम करू शकतील. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा होणार आहे, त्यासाठी आमचे त्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे. नाशिककरांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, हाच आमचा उद्देश आहे.” गेले १९ महिने हे पद का अडकले होते? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “आमच्याकडून याला कोणतीही हरकत नव्हती. हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यांनी तो घेतला आहे.” “मी लोकांच्या आशीर्वादाने उभा आहे” इस्कॉन मंदिराच्या अध्यक्षांनी केलेल्या एका दाव्याबाबत विचारले असता, भुजबळांनी त्यांना चिमटा काढला. “त्यांचे विधान त्यांना लखलाभ! मी सुद्धा भगवद्गीता पूर्ण वाचलेली नाही, तरीही मी अजूनही तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे. असे काही नसते, मी केवळ जनतेच्या आशीर्वादाने इथे उभा आहे,” असे उत्तर त्यांनी दिले. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर पत्रकारांनी छेडले असता, भुजबळांनी मिश्किलपणे उत्तर दिले. “आता तुम्हीच (पत्रकारांनी) यासाठी प्रयत्न करा,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. तसेच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी केवळ हसून दाद दिली आणि कोणतेही भाष्य केले नाही. मराठी भाषेच्या सक्तीवर ठाम भूमिका राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याच्या मुद्द्यावर भुजबळांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “जर कोणी मराठी बोलणारच नाही असा हट्ट धरून बसत असेल, तर सरकार त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई नक्कीच करेल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, सध्याच्या ‘Gen-Z’ (तरुण पिढी) च्या आंदोलनांवर बोलताना त्यांनी नमूद केले की, विरोधी पक्षही आता तरुणांना आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, हा लोकशाहीचा भाग आहे. हेही वाचा.. श्रीमद्भागवत वाचलं असतं तर अपघाती मृत्यू झाला नसता: अजित पवारांबाबत इस्कॉन अध्यक्ष डॉ. सूरदास यांचा दावा, म्हणाले- ‘मी स्वतः ग्रंथ भेट दिला होता’ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा वैयक्तिक दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अजित पवारांना हा ग्रंथ भेट दिला होता आणि तो आवर्जून वाचण्याची विनंतीही केली होती, असे डॉ. सूरदास यांनी सांगितले. अजित पवारांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असा आपला विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले. सविस्तर वाचा शिवसेना पक्ष-चिन्ह, अपात्रता खटला: पक्षांतराचे फायदे ते आजही उपभोगत आहेत; त्यांना थेट अपात्र ठरवा; देवदत्त कामत यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर दाखल्यांसह युक्तिवाद केला. कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवत न्यायालयाने स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना बंडखोरीच्या मूळ तारखेपासून अपात्र घोषित करावे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सलग ७ व्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सविस्तर वाचा
Source link
मराठी न बोलण्याच्या हट्टावर सरकार कारवाई करणारच:छगन भुजबळांचा इशारा, म्हणाले- मी भगवद्गीता पूर्ण वाचली नाही, तरीही तुमच्यासमोर खंबीरपणे उभा