Headlines

नागपूर महापालिकेच्या सभेत मराठीवरून गदारोळ:हिंदीत बोलण्यावर आक्षेप, सभा 10 मिनिटांसाठी तहकूब




नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठी भाषेच्या वापरावरून मोठा गदारोळ झाला. या वादानंतर सभा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेमुळे काँग्रेसमधील नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिका समोर आल्या. राज्यात मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच, महापालिकेच्या सभेतही याचा प्रत्यय आला. कामकाजादरम्यान, भाजपच्या शिक्षण समिती सभापती संतोषी नड्डा यांनी एका विषयावर हिंदी भाषेत भाष्य केले. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांनीही महापौरांकडे हिंदीमध्येच विषय मांडण्याची परवानगी मागितली. या प्रकारावर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी महापौरांकडे धाव घेत सभागृहात मराठी भाषेतच बोलणे अनिवार्य करण्याची आक्रमक मागणी केली. केतन ठाकरे यांच्या मागणीचा धागा पकडत भाजपच्या नगरसेवकांनी वसीम खान यांच्या हिंदी भाषेत विषय मांडण्याच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. एकाच पक्षातील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे काँग्रेसमधील मतभेद स्पष्टपणे दिसून आले. वाढत्या गोंधळाची गंभीर दखल घेत महापौरांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. या भाषिक वादामुळे नागपूर महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *