Headlines

पुणे वाहतूक कोंडी: सक्षम पायाभूत सुविधांची गरज:क्रेडाई अध्यक्ष मनीष जैन यांनी व्यक्त केली चिंता




पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असताना, वाढती वाहतूक कोंडी विकासातील प्रमुख अडचण ठरत आहे. माहिती-तंत्रज्ञान, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढीसाठी शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे मजबूत करण्याची गरज असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष मनीष जैन यांनी म्हटले आहे. जैन यांच्या मते, पुणे हे जागतिक कंपन्यांसाठी देशातील प्रथम पसंतीचे शहर बनवायचे असेल, तर वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा लागेल. यासाठी मेट्रो आणि शहर बससेवेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्यासोबतच रस्त्यांची स्थिती सुधारणे महत्त्वाचे आहे. शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर माहिती-तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक शहरात ये-जा करतात. यामुळे प्रमुख रस्ते, चौक आणि औद्योगिक परिसरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. मेट्रो मार्गांचा विस्तार, शहर बससेवेची क्षमता वाढवणे, रस्त्यांचे रुंदीकरण आणि देखभाल तसेच विविध वाहतूक साधनांमध्ये प्रभावी समन्वय साधणे यावर भर देण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, कुमार रियल्टीने मांजरी येथील १४० एकरांच्या ‘मॅग्नासिटी’ टाउनशिपच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले आहे. या परिसराला ईऑन आयटी पार्क, एसपी इन्फोसिटी आणि सायबरसिटीशी जोडणी आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळ, रिंग रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेनमुळे भविष्यातील कनेक्टिव्हिटी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, या विकासासोबत सक्षम सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते पायाभूत सुविधा उभारणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *