![]()
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी पुणे मनपात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या ऑडिटची मागणी केल्याचा ठपका ठेवत, सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नगरसेवकांचा विकासनिधी थेट ‘शून्य’ केला आहे. भाजपच्या या ‘आर्थिक नाकेबंदी’मुळे पुणे महापालिकेत महायुतीमधील धुसफूस आता टोकाला पोहोचली असून, राष्ट्रवादीने भाजपविरोधात थेट बंडाचे निशाण फडकावले आहे. नेमका वाद काय? राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विभागाच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे, असा प्रस्ताव महापालिकेत दिला होता. या प्रस्तावावर सुहास (सुनील) टिंगरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. हाच रोष मनात ठेवून भाजपने राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप आहे. बालवडकर आणि टिंगरे या दोन्ही नगरसेवकांचा विकासनिधी पूर्णपणे कापून शून्य करण्यात आला आहे. त्यांच्या प्रभागातील एकाही कामाला प्रशासकीय मान्यता किंवा निधीचे वर्गीकरण न मिळाल्याने दोन्ही नगरसेवक आक्रमक झाले आहेत. ‘आम्ही गप्प बसणार नाही’; राष्ट्रवादीचा कायदेशीर आणि राजकीय लढ्याचा इशारा या अन्यायाविरोधात राष्ट्रवादीने आज दुपारी 3 वाजता शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते नीलेश निकम आणि दीपक मानकर उपस्थित राहणार आहेत. नगरसेवकांनी घेतली आक्रमक भूमिका नगरसेवक निधी कपातीची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली जाणार आहे. तसा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे. “आमचे नेते अजितदादा पवार यांच्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, तरी त्यांनी कधीही कोणाचा एक रुपयाचा निधी रोखला नाही. विरोधकांचा आदर करण्याची ती संस्कृती होती,” अशी आठवण टिंगरे यांनी करून दिली. जर आमचा हक्काचा निधी मिळाला नाही, तर लोकशाही मार्गाने थेट कोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा टिंगरे यांनी दिला आहे. भाजपच्या या दडपशाहीला उत्तर म्हणून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आपला निधी सामूहिकपणे परत करून भाजपची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. दाखवतात राम, पण वागण्यात रावण! – बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, सत्ताधारी भाजपला बहुमताचा अहंकार झाला आहे. ‘सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली’ अशी यांची अवस्था आहे. हे तोंडाने प्रभू रामाचे नाव घेतात, पण यांचे वागणे रावणासारखे आहे. मी कधीकाळी भाजपमध्ये काम केले आहे, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. हा सर्वसामान्य जनतेवर झालेला अन्याय आहे. संविधानाचा अपमान की कामात ‘गौडबंगाल’? सुनील टिंगरे म्हणाले की, आम्ही फक्त स्वाक्षरी केली म्हणून जर जनतेचा 12 कोटींचा निधी रोखला जात असेल, तर ही निव्वळ हिटलरशाही आहे. आम्ही केवळ चौकशीची मागणी केली होती; जर काही चुकीचे केले नसेल, तर भाजपला चौकशीची एवढी भीती का? यात काही ‘गौडबंगाल’ आहे का? असा सवाल टिंगरेंनी केला आहे. पुढील घडामोडी दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. राज्यात जरी दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले, तरी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी बाकांवर असल्याने आपण आपली भूमिका चोख बजावणार असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. आज दुपारच्या बैठकीनंतर पुण्यातील महायुतीचे राजकारण कोणते नवीन वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
पुण्यात महायुतीत 'ऑडिट' बॉम्ब!:चंद्रकांत पाटलांवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; दोन नगरसेवकांचा निधी थेट 'शून्य'