![]()
राज्यात सध्या रस्त्यांची क्वालिटी, शिक्षण, आश्रमशाळा किंवा अंगणवाड्या कशाचीही ‘गॅरंटी’ उरलेली नाही. दुसरीकडे पुण्यात कोयता गँग, खून आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारीत पुणे राज्यात एक नंबरवर असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला घालण्यात आलेल्या अटी-शर्तींवरून आणि बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. राहुल गांधींच्या दौऱ्याला एवढ्या अटी कशाला? काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुण्यात येत आहेत, मात्र या दौऱ्याला प्रशासनाकडून विविध अटी घालण्यात आल्या आहेत. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राहुल गांधी हे युवा नेते आहेत. ते जर पुण्यात येत असतील, तर त्यांच्या दौऱ्याला एवढ्या अटी आणि शर्ती कशाला घातल्या जात आहेत? ते शांततेच्या मार्गाने येणार, मुलांशी संवाद साधणार, भाषण करणार आणि जाणार आहेत. याच्यात गैर काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गुन्हेगारीत पुणे एक नंबरवर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुळे म्हणाल्या, “पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. खून, विनयभंगाचे प्रकार सर्रास घडत आहेत. गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे आज महाराष्ट्रात एक नंबरवर गेले आहे. विशेष म्हणजे हा डेटा माझा नाही, तर ज्यांचे नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतात, त्या भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा हा अहवाल आहे.” पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर प्रतिक्रिया शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष पुन्हा एकत्र येत असल्याची चर्चा आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता सुळे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे म्हणत सुळे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. ‘खोट्या केसेस केल्या तर खपवून घेणार नाही’ बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणावरून बजरंग सोनवणे यांना लक्ष्य केले जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांच्या पाठीशी आमचा पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे. आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे. आमचे म्हणणे स्पष्ट आहे, गलीच्छ राजकारण कुणाच्याही घरापर्यंत आणू नका. जर कोणाकडून काही चूक झाली असेल, तर आम्ही माफी करणार नाही. पण सरकारच्या माध्यमातून जर जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीने खोट्या केसेस केल्या गेल्या, तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही, आम्ही याविरोधात रस्त्यावर उतरून लढू,” असा इशारा सुळे यांनी दिला. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगर हादरले:आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; धक्का बसलेल्या आईनेही मारली उडी छत्रपती संभाजीनगर शहरात आज एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर, आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनेही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अशा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण संभाजीनगर जिल्हा हादरला आहे. सविस्तर वाचा
Source link
रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची गॅरंटी नाही, गुन्हेगारीत पुणे एक नंबर:खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; राहुल गांधींच्या दौऱ्यावरही सवाल