Headlines

शरद पवार भेटीवर पार्थ पवारांनी दिलं थेट उत्तर:राष्ट्रवादीच्या बैठकीत अंतर्गत वादावर खलबतं, सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत




राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या, तर जय पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, संघटनेची स्थिती आणि पक्षांतर्गत निर्माण झालेले मतभेद यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षातील वाद बाजूला ठेवून एकत्रितपणे जनतेसमोर जाण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे घेतलेल्या भेटीचाही विषय निघाला. पार्थ आणि शरद पवार यांच्यात तीन तास चर्चा झाल्याने या भेटीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ पवार यांच्याकडे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि दोघांमध्ये काय ठरले, याबाबत विचारणा केली. मात्र, पार्थ पवार यांनी या चर्चेत विशेष राजकीय विषय नसल्याचे सांगत फार काही घडले नसल्याचे स्पष्ट केले. ही भेट वैयक्तिक विषयांपुरतीच होती, असे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पक्षाच्या बैठकीत सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरही चर्चा झाली. त्यांच्या या भूमिकेकडे पक्षविरोधी कृती म्हणून पाहिले जात असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. पक्षासंदर्भात काही अडचणी किंवा नाराजी असल्यास ती वरिष्ठ नेत्यांसमोर मांडायला हवी होती; मात्र थेट निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे पत्र देणे योग्य नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या पत्राला पक्षाकडून लवकरच उत्तर दिले जाणार असून सच्चिदानंद सिंह यांच्याविरोधात कायदेशीर तसेच संघटनात्मक कारवाई होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीनंतर पक्षातील चर्चेची माहिती दिली. स्थानिक पातळीवर यापूर्वी काही बैठका झाल्या होत्या. मात्र, आज राज्याच्या व्यापक संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यातील इतर भागांमधील संघटनेची परिस्थिती आणि आगामी वाटचाल यावर चर्चा झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. सच्चिदानंद सिंह यांच्याविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघटनात्मक एकजुटीवर भर पक्षात अंतर्गत दुफळी असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला. आमच्यात कधीही दुफळी नव्हती, असे सांगत त्यांनी अशा चर्चा केवळ कल्पनेवर आधारित असल्याचे म्हटले. दरम्यान, आजच्या बैठकीत प्रशांत किशोर सहभागी झाले नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकीकडे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीभोवती राजकीय चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीने संघटनात्मक एकजुटीवर भर देत अंतर्गत वाद मिटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *