![]()
पुण्यात बाणेर पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई 19 ऑगस्ट रोजी बालेवाडीतील पाटीलनगर परिसरात करण्यात आली. तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल इंगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोकळ्या मैदानात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या ओंकार बाबासाहेब जाधव (वय 20, रा. पारखे वस्ती, सुसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीदरम्यान स्टीलचे गावठी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळली. चौकशीत जाधवने हे शस्त्र नृसिंह रामचंद्र भिडे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बालेवाडीतील ईडन व्हिस्टा सोसायटीजवळ सापळा रचून नृसिंह भिडे (वय 25, रा. पारखे वस्ती, सुसगाव) यालाही अटक केली. बाणेर पोलिसांचे तपास पथक पुढील तपास करत आहे. सुर्वेज हॉटेलवर छापा टाकून अवैध दारूचा साठा जप्त दरम्यान, बाणेर पोलिसांनी मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सुर्वेज हॉटेलवर छापा टाकून अवैध दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत 61 हजार 220 रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, हॉटेल व्यवस्थापकासह मालकाला अटक करण्यात आली आहे. बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू असताना, पोलिस शिपाई बालाजी सानप यांना सुर्वेज हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना दिली, ज्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी हॉटेलमध्ये पाहणी केली असता, दारू व बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. हॉटेल व्यवस्थापक गोपाळ श्रीकृष्ण निघळे (वय 45, रा. रुब सोसायटी, सांगवी) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणी निघळे याच्यासह हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय 31, रा. सिल्वर क्राउन अपार्टमेंट, कृष्णानगर, पिंपळे गुरव) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चुलबुला रजनीकांत आणि सहायक पोलिस आयुक्त ब्रह्मदेव गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Source link
पुण्यात बाणेरमध्ये गावठी पिस्तुलासह दोघांना अटक:पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली, अवैध दारूही जप्त