![]()
“महाराष्ट्रात राहून किती वर्षे झाली? थोडीफार मराठी बोलता येते का? किमान एक वाक्य तरी बोलून दाखवा…” मुंबईसह संपूर्ण एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) मधील रस्त्यांवर सध्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून परप्रांतीय ऑटो व टॅक्सीचालकांना थांबवून असे थेट व परखड प्रश्न विचारले जात आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास चालकांच्या हातात – “एका महिन्यात मराठी शिकून आरटीओ कार्यालयात हजर व्हा, अन्यथा परवाना आणि बॅज निलंबित केला जाईल. तीन महिन्यांतही न शिकल्यास बॅज कायमचा रद्द होईल,’ अशी थेट इशारा देणारी नोटीस दिली जात आहे. त्यावर अनेक अमराठी भाषिकांनी कांगावा सुरू केला आहे. कांदिवली येथील केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यालयाजवळ दहिसर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक भूषण श्रीहरी राऊत वाहनांची तपासणी करताना दिसून आले. येथे गेल्या २०-२२ वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेले सुमारे ५० वर्षीय चालक बाबूलनाथ मिश्रा यांनी मोडक्या-तोडक्या मराठीत सांगितले—”माझं नाम बाबूलनाथ मिश्रा आहे.” अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना दुरुस्त केले—”नाम’ नव्हे, ‘नाव’. यासह इतर प्रश्नांची अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने मिश्रा यांच्या हातात नोटीस देण्यात आली. तर दुसरीकडे ३५ वर्षे मुंबईत राहूनही मराठी समजत असली तरी बोलता येत नसल्यामुळे अर्जुन यादव यांनाही नोटीस बजावण्यात आली. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील स्थलांतरित चालक कांगावा करू लागले आहेत. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील मराठीबहुल भागांत अनेक चालक अस्खलित मराठी बोलताना आढळले. वरळी नाका येथे भेटलेले महेंद्र तिवारी म्हणाले, “आमचे कुटुंब ५० वर्षांपासून वरळीत राहत असल्याने मराठी भाषेवर उत्तम पकड आहे. मुंबईत काम करताना ही गरजही आहे.’ २ दिवसांत २,०४५ जणांना नोटिसा, मुंबईत ९३% उल्लंघन मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात तपासलेल्या ८,२१७ वाहनांपैकी १,२६८ चालकांना (मुंबईत ६०४, उर्वरित महाराष्ट्रात ६६४), तर दुसऱ्या दिवशी झाडाझडती घेतलेल्या ५,२११ पैकी ७७७ चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञानही नसल्याचे निष्पन्न झाले. यात एकट्या मुंबई महानगर क्षेत्रातील ७२२ चालकांचा समावेश असून हे प्रमाण तब्बल ९३% आहे. दोन दिवसांत एकूण २,०४५ जणांना आरटीओने थेट परवाना व बॅज निलंबनाची नोटीस बजावली आहे. शिकण्यास विरोध नाही मराठी शिकण्यास विरोध नाही, मात्र परवाना रद्दची धमकी देणे अयोग्य आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ चालकांना यातून सवलत देऊन प्रशिक्षण केंद्रे वाढवावीत. काही ठिकाणी मराठी शिकवण्याच्या नावाखाली ३०० ते ५०० रुपये वसुली आणि पक्ष सदस्यत्वासाठी दबाव आणला जात आहे. -के. के. तिवारी, मुंबई अध्यक्ष, स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियन संघटनांची मागणी : दबाव नको, सवलत देण्यात यावी मोठ्या संख्येने चालकांना अद्याप मराठी आत्मसात करता आलेली नाही. परिवहनमंत्र्यांना पत्र लिहून ३ महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ द्यावी आणि तोपर्यंत दंडात्मक कारवाई थांबवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. – शशांक राव, अध्यक्ष, महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना):
Source link
नोटीस मिळताच अमराठी भाषिकांचा कांगावा सुरू:ऑटोचालकांची रस्त्यावर ‘मराठी परीक्षा’