![]()
भोर तालुक्यातील प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि ७६५ केव्ही क्षमतेच्या टॉवर लाईन प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा असंतोष आता उफाळून आला आहे. या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी आज बाधित गावकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि चक्क जनावरांसह रस्त्यावर उतरून भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ११६ गावांचा प्रकल्पाला विरोध या प्रस्तावित भव्य वीज प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील ७१ आणि राजगड तालुक्यातील ४५ अशी तब्बल ११६ गावे बाधित होण्याची शक्यता आहे. आपल्या अस्तित्वाची आणि उपजीविकेची लढाई लढण्यासाठी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाला प्रखर विरोध करत आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी; प्रशासनाचे आवाहन आजच्या आंदोलनात हजारो ग्रामस्थ आणि शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. महामार्गावर बैलगाड्या आणि ट्रॅक्टर आडवे लावल्याने साताऱ्याकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे. वादाची पार्श्वभूमी आणि चिघळण्याची शक्यता भोंगवली प्रकल्पाचा हा वाद नवा नाही. यापूर्वीही कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात मोठा संघर्ष उडाला होता. त्यावेळी कंपनीकडून जीवघेणा हल्ला आणि कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा आरोप ग्रामस्थांवर करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कंपनीच्या दबावाखाली आपल्यावर अन्यायकारक कारवाई केली जात असून, या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. हेही वाचा.. भाजप म्हणजेच पेड इव्हेंट: राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार, फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमावरही निशाणा पुण्यात पार पडलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला भाजपने ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा आजचा नागपूरमधील ‘जेन झी’ मेळावा आणि राज्य सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना हे दोन्ही ‘पेड इव्हेंट’ असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला. तसेच, शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. सविस्तर वाचा
Source link
पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको:भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये ग्रामस्थांचा एल्गार, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह आंदोलन