![]()
राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “आमदार आणि खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात, मात्र जेव्हा विषय अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा येतो, तेव्हाच सरकारला विलंब का होतो?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट करत सरकारच्या संथ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘कर्जमाफी की नुसत्याच तारखा?’ रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राज्य सरकारने सुरुवातीला ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफी जाहीर करताना त्यात अनेक जाचक अटी आणि शर्ती टाकल्या गेल्या. या अटी रद्द करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन आणि उपोषण करावे लागले. त्यानंतर कुठे सरकारने अटी काढल्या. आम्हाला वाटले होते की आता तरी शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल. २ जूनला राज्य सरकारने कर्जमाफीचा जीआर (GR) काढला, पण ३० जून उलटून गेली, त्यानंतर अनेक तारखा गेल्या, पावसाळी अधिवेशनही संपले, तरीही शेतकरी कर्जमाफीचे काम अत्यंत संथगतीनेच सुरू आहे.” ८० दिवसांत फक्त १० टक्के काम! कर्जमाफीच्या आकडेवारीवर बोट ठेवत पवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. “कर्जमाफीची घोषणा होऊन आज ८० हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. पण, राज्यातील तब्बल ५६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आजघडीला केवळ ६ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. हे प्रमाण एकूण लाभार्थ्यांच्या केवळ १० टक्के एवढेच आहे. जर शासनाचे काम याच कासवगतीने सुरू राहिले, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळायला तब्बल दीड ते दोन वर्षे लागतील,” अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर याद्या जाहीर करा! आमदार रोहित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावताना तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. “सरकारने आता जास्त वेळ न दवडता, कर्जमाफीच्या राहिलेल्या सर्व याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्यात आणि संकटात असलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. रोहित पवार यांच्या या थेट आणि आक्रमक पवित्र्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा.. मी मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद:नागपुरात ‘जेन झी’ सोबतच्या संवादात मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील ‘मंथन-4’ च्या मंचावरून आपल्या राजकीय प्रवासाबाबत आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी या राज्याचा मुख्यमंत्री कसा झालो, ही केवळ लोकशाहीची कमाल आणि संविधानाची खरी ताकद आहे.” तसेच, भविष्यात कोणालाही जर राज्याचे मुख्यमंत्री व्हावेसे वाटले, तर त्यासाठीही याच संविधानाचे आणि भक्कम लोकशाही व्यवस्थेचे सामर्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील युवक उपस्थित आहेत. सविस्तर वाचा
Source link
आमदार-खासदार फोडायला रातोरात खोके जातात:मग कर्जमाफीला विलंब का? रोहित पवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल