![]()
गुलटेकडी येथील बांधकाम कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत शेडगे यांच्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. या गुन्ह्यात बाळा शेडगे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी तक्रारदाराच्या वतीने या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर शेडगे यांच्या वतीने ॲड. आकाश कामठे, ॲड. आबाद पोंडा आणि ॲड. कुलदिप निकम यांनी तक्रारदाराला या अर्जात प्रतिवादी क्रमांक दोन करण्यासाठी परवानगी मागितली. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करून अर्जात आवश्यक बदल करण्यास परवानगी दिली. तक्रारदाराच्या वकीलांनी न्यायालयाची नोटीस स्विकारल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी दोन सप्टेंबर रोजी ठेवली. तोपर्यंत शेडगे यांच्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले. बांधकामासाठी सेंटरिंगची कामे आणि मजूर पुरविण्याचे काम करणारे खलील शेख (वय ६५) यांनी १६ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा यांच्यासह बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
माजी नगरसेवक शेडगेला आत्महत्या प्रकरणात दिलासा:उच्च न्यायालयाचे पुढील सुनावणीपर्यंत सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश