Headlines

श्रावणात नांदगावचे श्री खंडेश्वर मंदिर भाविकांनी फुलले:सोमवारी हजारो भाविकांची गर्दी; हेमाडपंथी मंदिरात भक्तिमय वातावरण




श्रावण महिना सुरू होताच नांदगाव खंडेश्वर येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांनी गजबजून गेले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. अमरावतीपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर, नांदगाव खंडेश्वर गावाच्या मध्यभागी हे पुरातन मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर काळ्या दगडांची भव्य तटबंदी आणि त्यामागे असलेले देखणे हेमाडपंथी मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील भव्य शिवलिंग आहे. उत्तर दिशेला शिव-पार्वतीचे तर दक्षिण दिशेला भगवान नरसिंहाचे मंदिर आहे. तिन्ही मंदिरांसाठी एकच प्रशस्त सभामंडप असून, समोर आकर्षक नंदी विराजमान आहे. मंदिर परिसरातील सुमारे १०० फूट उंच दीपमाळही भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. श्रावणी सोमवारी भाविक महादेवाला जलाभिषेक, बेलपत्र व फुलांची पूजा करून दर्शन घेतात. पहाटेपासून सुरू होणारी पूजा-अर्चा आणि सायंकाळची आरती यामुळे दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण असते. स्थानिक श्रद्धेनुसार, श्रावणी सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर या तिन्ही देवांचे दर्शन घेतल्यास काशीला गेल्याचे पुण्य मिळते. यामुळे श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. साडेआठशे वर्षांचा इतिहास असलेले श्री खंडेश्वर मंदिर आजही नांदगाव खंडेश्वरची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपते. श्रावण महिन्यातील भाविकांची वाढती गर्दी या पुरातन मंदिराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करते. मंदिरातील शिलालेखानुसार, या मंदिराला सुमारे ८५० वर्षांचा इतिहास आहे. शके ११७७ (इ.स. १२५५) च्या सुमारास देवगिरीचे राजे रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी या मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरातील दगडी खांबांवरील राजपरिवार, राजनर्तकी, शिव-पार्वती तसेच विविध देवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती आजही प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *