Headlines

फडणवीसांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांचा मुख्यमंत्रीपदाच्या गरिमेचा सल्ला




काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. मोदी-शहा यांना खूश करण्यासाठी काँग्रेसवर सातत्याने तथ्यहीन टीका करण्याच्या नादात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखावी आणि बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये, असे तिवारी म्हणाले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही फडणवीस दिशाभूल करणारी विधाने करत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या ३३ टक्के महिला आरक्षणाच्या घटनादुरुस्तीमध्ये परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आरक्षण लागू करू नये, असे कुठेही नमूद नाही. ही प्राथमिक माहितीही फडणवीसांना नसावी, याचे आश्चर्य वाटते, असे तिवारी म्हणाले. महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध असल्याचे वारंवार सांगून फडणवीस नेमके काय सिद्ध करू इच्छितात, असा सवाल तिवारी यांनी केला. तथ्य तपासून आणि घटनात्मक तरतुदी समजून घेऊन बोलण्याऐवजी विरोधकांवर आरोप करण्याची घाई करणे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही, असेही त्यांनी नमूद केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महिला आरक्षणाचा मुद्दा उमेदवारीच्या पातळीवर किती गांभीर्याने घेतला, याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे, असे तिवारी म्हणाले. महिला आरक्षणाची घोषणा करूनही भाजपने त्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी दिली नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा काँग्रेस-महाविकास आघाडीला मिळाल्या, तर भाजप-महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या, या निकालातून जनतेने भाजपच्या राजकारणाला दिलेला कौल फडणवीसांनी समजून घ्यावा, असे तिवारींनी सांगितले. राहुल गांधी यांच्या महिला धोरणाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याऐवजी फडणवीसांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने भाषणबाजीपेक्षा वैचारिक प्रगल्भता, तथ्याधारित भूमिका आणि घटनात्मक मूल्यांचे भान दाखवणे अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीसांनी वायफळ बोलघेवडेपणा कमी करून मुख्यमंत्रीपदाची गरिमा जपावी, असा सल्ला तिवारी यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *