Headlines

अमरावती हादरली!:डफरिन रुग्णालयाच्या NICU कक्षात भीषण आग; धुराने गुदमरून 3 चिमुकल्यांचा मृत्यू




येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे लागलेल्या या आगीत धुराने गुदमरून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर, गंभीर भाजलेल्या आणि गुदमरलेल्या सहा बालकांचा तातडीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीनही कक्षांमध्ये मिळून 39 बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास एका कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. यामुळे क्षणार्धात संपूर्ण विभागात आग आणि धूर पसरला. घटनेच्या वेळी संबंधित कक्षात 12 बालके उपचारासाठी दाखल होती. आग लागल्याचे निदर्शनास येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बालकांना कक्षाबाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने धुराचे लोट जास्त असल्याने 3 चिमुकल्यांचा जागीच गुदमरून अंत झाला. अवघ्या वर्षभरापूर्वीच हा अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. इतक्या नवीन विभागात आग लागल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा आणि अग्निरोधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित का झाली नाही, असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. स्फोटाचे नेमके कारण काय? या दुर्घटनेत काही बालकांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, आजूबाजूच्या इतर कक्षांतील बालकांना खबरदारी म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग लागली तेव्हा सुरक्षेसाठी तैनात असलेले कर्मचारी नक्की कुठे होते, तसेच स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर या दुर्घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निष्पाप बालकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *