![]()
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत मोहोळ शहरातील कन्या प्रशाला ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरादरम्यान उड्डाणपुलालगत करण्यात आलेल्या अंडरग्राउंड गटाराच्या कामामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे, गटार रस्त्याच्या पातळीपेक्षा तब्बल दोन फूट उंच झाल्याने या कामाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मोहोळ शहरातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससह खासगी वाहनांची मोठी वर्दळ या सर्व्हिस रोडवर असते. त्यामुळे या मार्गावर वारंवार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सायकलवरून किंवा पायी जाताना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. त्यातच रस्त्यापेक्षा उंच झालेल्या गटारामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. यामुळे पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणेने या कामाची तातडीने पाहणी करून गटाराची उंची, बांधकामाची गुणवत्ता आणि पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.अंडरग्राउंड गटाराचे काम पावसाचे तसेच इतर पाण्याचा निचरा करण्यासाठी करण्यात आले रस्त्याची पातळी लक्षात घेऊन गटाराचे बांधकाम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गटार रस्त्यापेक्षा उंच झाल्याने कामाच्या दर्जाबरोबरच नियोजनावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियोजनाचा अभाव की ठेकेदाराचा हलगर्जीपणा? अशी चर्चा शहरात सुरू आहे.संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून कामातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ^विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि व्यापाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता संबंधित महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराने तातडीने या गटाराची उंची कमी करून रस्त्याच्या पातळीशी समतल करावे. पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, याची खात्री करावी. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. – संतोष गायकवाड, प्राचार्य, इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ,
Source link
रस्त्यापेक्षा 2 फूट उंच गटार; विद्यार्थी, वाहनधारकांची डोकेदुखी मात्र वाढली:नियोजनाचा अभाव की ठेकेदाराचाहलगर्जीपणा? शहरामध्ये चर्चा