![]()
गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेल्या पावसानंतर आता नवीन समस्या डोके वर काढू लागली आहे. पावसाच्या पाण्यामुळे शहरातील मोकळे भूखंड, पडीक जागा, कॉलन्यांच्या अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर निरुपयोगी गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. या गवताच्या साम्राज्यामुळे उपनगरांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून साथीच्या आजारांचे सावट निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सावेडी परिसर (पाइपलाइन रोड, तपोवन रोड, वसंत टेकडी, प्रेमदान चौक), केडगाव (रेल्वे स्टेशन भाग, शाहूनगर), बोल्हेगाव, नागापूर, तारकपूर, माळीवाडा आणि मुकुंदनगर या भागांत ही समस्या गंभीर बनली आहे. मोकळ्या जागांवर वाढलेल्या उंच गवतामुळे प्राण्यांचा वावर थेट मानवी वसाहतींपर्यंत पोहोचला आहे. यामुळे नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि गवतामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. परिणामी साथीच्या आजारांचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही विशिष्ट वनस्पतींच्या परागकणांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना त्रास व ॲलर्जीच्या तक्रारी भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी गवताच्या आडोशाने कचरा फेकला जात असल्याने दुर्गंधी आणि उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या समस्येकडे महापालिका प्रशासन आणि भूखंडधारकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असून, तात्काळ संपूर्ण शहरात स्वच्छता आणि औषधफवारणी मोहीम राबवण्याची मागणी होत आहे. महानगरपालिका प्रशासन: सार्वजनिक रस्ते, दुभाजक आणि शासकीय भूखंडांवरील गवत काढणे ही प्रशासनाची थेट जबाबदारी आहे. तसेच खाजगी भूखंडधारकांना स्वच्छतेची नोटीस देणे व शहरात नियमित धूर फवारणी करणे आवश्यक आहे. खाजगी भूखंडधारक: स्वतःच्या मालकीची मोकळी जागा स्वच्छ ठेवणे ही जागा मालकाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मुदतीत स्वच्छता न केल्यास महापालिकेने दंड आकारून प्रशासकीय खर्चासह ती जागा स्वच्छ करून घेतली पाहिजे. महापालिका व भूखंडधारकांवर स्वच्छतेची जबाबदारी
Source link
उपनगरांत गवताचे साम्राज्य; सरपटणारे प्राणी अन् डासांचा वाढलाय प्रादुर्भाव:सावेडी, बोल्हेगावात मोकळ्या जागांत झुडपांचे साम्राज्य