Headlines

वैजापूरमधील परसोड्यात एकादशीला भक्तीचा महासागर:संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहात 30 हजार भाविकांची उपस्थिती




वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे सुरू असलेल्या ४७व्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला एकादशीच्या दिवशी भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी झाली. नवव्या दिवशीच्या कीर्तन सेवेला सुमारे ३० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने परिसर दुमदुमून गेला. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अंतरीचा भाव जाणे तो देव’ या अभंगातून उपस्थित भाविकांना प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे एकच रूप पाहण्याचा संदेश दिला. देव केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे जात-पात, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद न करता प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे रूप पाहावे, असा उपदेश त्यांनी केला. ‘दुसऱ्याची सेवा म्हणजे देवाचीच सेवा’ शुद्ध भाव, दया आणि प्रेम असलेल्या मनाला देवाचे खरे स्वरूप जाणवते. सुख-दुःखात समभाव ठेवणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे हीच खरी भक्ती असल्याचे महाराजांनी सांगितले. ‘देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही; आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवात वासुदेवाचे रूप पाहा,’ असा संदेशही त्यांनी दिला. ३० हजार भाविकांसाठी १०० क्विंटल साबुदाणा खिचडी एकादशीनिमित्त सप्ताहस्थळी भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचा फराळ प्रसाद देण्यात आला. सुमारे ३० हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यासाठी तब्बल १०० क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली. यामध्ये ५१ क्विंटल साबुदाणा, २० क्विंटल शेंगदाणे, २० क्विंटल बटाटे, १० क्विंटल हिरवी मिरची आणि ३५ डबे खाद्यतेलाचा वापर करण्यात आला. सांगतेला ५० हजार भाविकांची शक्यता सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला सुमारे ५० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी बुंदी आणि घुगरीचा प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे. बुंदी तयार करण्यासाठी १११ पोती साखर व चणाडाळ, तर सुमारे ३५ क्विंटल हरभऱ्याची घुगरी तयार करण्यात येत आहे. सप्ताहस्थळीच प्रसादाची तयारी करण्यात येत असून आचारी शिवाजी कवडे, कृष्णा कवडे, राजू शेरकर यांच्यासह सुमारे ८० कामगार त्यासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सप्ताहाच्या दहा दिवसांच्या कालावधीत भाविकांसाठी हजारो लिटर शुद्ध फिल्टर पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. परसोडा येथील रणजित बैनाडे आणि सुभाष बैनाडे बंधू ही सेवा देत आहेत. तसेच भाविकांच्या पंगती वाढण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, गावातील तरुण, परिसरातील युवक आणि भाविक सहभागी होणार आहेत. संत बहिणाबाई महाराजांच्या सप्ताहामुळे परसोडा परिसरात सध्या भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, सांगता सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. सप्ताहाच्या विविध कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी आणि परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. हेही वाचा.. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *