![]()
शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार पौष्टिक, सुरक्षित, स्वच्छ व अन्न सुरक्षा मानकांनुसार असावा. स्वयंपाकगृह व भांड्यांची स्वच्छता, अन्नधान्याची योग्य साठवणूक, स्वच्छ पाण्याचा वापर तसेच शिजविलेल्या अन्नाची सुरक्षित हाताळणी याबाबत मुख्याध्यापकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी केले. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शिक्षण विभाग कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व सकस आहार’ या विषयावर लोकनेते ए. टी. पवार सभागृह येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली, त्या वेळी देवरे बोलत होते. व्यासपीठावर अन्नसुरक्षा अधिकारी चेतन परदेशी, गटविकास अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार, माजी गटशिक्षणाधिकारी परशराम महाले, विस्ताराधिकारी प्रवीण वराडे, सतीश खंदारे व शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गोंधळी उपस्थित होते. स्वयंपाकी व मदतनीसांकडे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असावे. स्वयंपाक करताना ॲप्रन, हेडकॅप व हेअरनेटचा वापर करावा. नखे व केस स्वच्छ ठेवून वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. शाळांनी दैनंदिन आहाराचा दर्जा, निर्धारित मेनू, स्वयंपाकघराची स्वच्छता व अन्न साठवणुकीबाबत नियमित दक्षता घ्यावी. शालेय स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची अन्नसुरक्षा परवाना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी भरत पाटील, मयुरी जाधव, केंद्रप्रमुख व सर्व शिक्षण साधन व्यक्तींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महारू निकम यांनी केले. विद्यार्थ्यांचे चांगले आरोग्य ही सामूहिक जबाबदारी शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना सकस व सुरक्षित आहार मिळण्यासाठी शाळा व संबंधित प्राधिकरणांनी समन्वयाने काम करावे. अन्नधान्याचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याची गुणवत्ता तपासावी. मुदतबाह्य किंवा संशयास्पद खाद्यपदार्थांचा वापर टाळावा. स्वयंपाकगृहात कीटक व उंदीर प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना जंक फूड देऊ नये. निकृष्ट दर्जाचा आहार किंवा स्वच्छतेत त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
Source link
विद्यार्थ्यांच्या ताटात स्वच्छ, सुरक्षित आहार द्या:‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या मुख्याध्यापकांना सूचना