![]()
अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेने पोषण आहारासाठी मिळणारा पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष म्हणजे, निकृष्ट आहाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या संबंधित अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका झाली. त्यानंतर संबंधित सेविकेचे निलंबन मागे घेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. बालकांच्या पोषणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पुढील 48 तासांत संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराची तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 9 ते 10 शिट्ट्या होऊनही वाटाणा शिजत नाही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. या व्हिडीओमध्ये पांढरा वाटाणा आणि भरडा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला होता. अंगणवाडी सेविकेच्या म्हणण्यानुसार, पांढरा वाटाणा आदल्या दिवशी भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये तब्बल नऊ ते दहा शिट्ट्या करूनही व्यवस्थित शिजत नाही. भरड्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले होते. असा आहार लहान मुलांना कसा द्यायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. “मुलांच्या आहारात हा वाटाणा दिला जातो. मात्र, अनेक वेळा तो शिजत नाही. मुलांनाही तो खायला आवडत नाही. मग आम्ही हा आहार त्यांना कसा द्यायचा?” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याच व्हिडिओमधून त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. भेसळयुक्त आणि निकृष्ट पदार्थांविरोधात कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे अंगणवाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेचीही तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तक्रार करणाऱ्या सेविकेवरच निलंबनाची कारवाई या व्हिडीओनंतर संबंधित अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले. निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा मांडणाऱ्या सेविकेचे कौतुक करण्याऐवजी तिच्यावर कारवाई का करण्यात आली, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर जोरदार टीका केली. व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य समोर आणणाऱ्या कर्मचाऱ्याचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित सेविकेचे निलंबन तातडीने रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. खासदार अमोल कोल्हे यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही या प्रकरणावर सरकारला लक्ष्य केले. त्यामुळे या कारवाईची चर्चा राज्यभर झाली. अखेर निलंबन मागे राजकीय आणि सामाजिक स्तरातून टीका वाढल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील संबंधित अंगणवाडी सेविकेचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला दिल्याची माहिती समोर आली. एका बाजूला सेविकेवरील कारवाई मागे घेण्यात आली असतानाच दुसऱ्या बाजूला आता महिला व बालविकास विभागाने संपूर्ण राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर सरकारने आहाराच्या गुणवत्तेबाबत अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. 48 तासांत सर्व अंगणवाड्यांची तपासणी मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट द्यायची आहे. ही तपासणी पुढील ४८ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासणीमध्ये अंगणवाडीत पोहोचलेला पोषण आहार योग्य दर्जाचा आहे की नाही, तो सुरक्षित आहे की नाही आणि तो बालकांना देण्यायोग्य स्थितीत आहे की नाही, याची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. केवळ स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांवरच ही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. विभागीय आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनानेही आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराच्या गुणवत्तेची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. खराब आहार आढळल्यास तातडीने बदलणार तपासणीदरम्यान एखाद्या अंगणवाडीत पोषण आहार अयोग्य किंवा खराब दर्जाचा आढळल्यास तो तातडीने संबंधित पुरवठादाराकडून बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे. त्यामुळे निकृष्ट आहार अंगणवाडीतील बालकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी पुरवठ्यापासून वितरणापर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे. मंत्री तटकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तपासणी झाल्यानंतरही पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाईल. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य राज्यातील बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व दर्जेदार पोषण मिळण्यासाठी अंगणवाडी व्यवस्था महत्त्वाची आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका महिला व बालविकास विभागाने घेतली आहे. आंबेगावातील एका सेविकेने आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुरू झालेला वाद आता राज्यव्यापी तपासणीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या ४८ तासांच्या तपासणीत राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराची प्रत्यक्ष गुणवत्ता किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्याची आवराआवर: कुंभमेळ्याच्या निधीत 27 कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मोदी सरकारसह सरन्यायाधीशांवर निशाणा नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, त्याआधी ते राज्यातील प्रलंबित कामे उरकून आपली माणसे महत्त्वाच्या पदांवर बसवण्याची आवराआवर करत असल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार, विमानतळांचे खासगीकरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
अंगणवाडी निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारीनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये:48 तासांत सर्व केंद्रांची तपासणी, आदिती तटकरेंचा कडक इशारा