![]()
हिंगोली शहरातील अकोला रोड भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी अतुल बोरकर हे सोमवारी ता. २४ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. यावेळी अकोला रोड भागात काही व्यक्ती एका वाहना चालकासोबत वादावादी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बोरकर यांनी त्यांचे दुचाकी वाहन थांबविले अन घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी बोरकर यांनी वाहन चालक व त्याच्याशी वादावादी करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेख छोटू (रा. गारमाळ) व अन्य दोघांनी पोलिस कर्मचारी बोरकर यांनाच शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी बोरकर हे समजावून सांगत असतांनाही त्यांनी त्यांचे काहीएक ऐकले नाही. त्यानंतर बोरकर यांना गालावर, ओठावर, चाळ्यावर मारहाण करून जखमी केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ते प्रतिकार करू शकले नाही. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या बोरकर यांना तातडीने उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बोरकर यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी शेख छोटून व अन्य दोघांवर शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, उपनिरीक्षक साखरे, एन. बी. काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु केला आहे.
Source link
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण:तिघांवर गुन्हा दाखल, हिंगोलीतील घटना