![]()
निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचा अद्याप पूर्ण पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ उलटला असून, तालुक्यात तब्बल १,५२७ पुस्तक संचांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके उपलब्ध न झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रश्नाबाबत पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे पाठ्यपुस्तकांच्या तुटवड्याबाबत जाब विचारला. यावेळी प्रमोद पाटील, राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यात इयत्ता पाचवीचे ७६८, सहावीचे ६१४, सातवीचे १११, चौथीचे २७ आणि दुसरीचे ७ संच कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, शासनाची मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तातडीने पुस्तकांचा पुरवठा करावा; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्याचा इशारा प्रकाश पाटील यांनी दिला.
Source link
निफाडमध्ये 1,527 पुस्तक संचांचा तुटवडा:अडीच महिने उलटूनही पूर्ण संच उपलब्ध नाहीत