Headlines

विद्यार्थिनींनी जवानांसाठी विणला मायेचा धागा‎:प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी गुंफला जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर‎




देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांप्रती आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या घरातील भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशीही आपले भावनिक नाते आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा सुंदर प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा बजावत असतात. त्यांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि लहान वयातच त्यांच्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर गुंफला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या जवान राम बाबुराव जाधव यांच्या हस्ते सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या. जवानांच्या मनगटावर ही राखी बांधली जाणार असून, देवगावच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातून विणलेला हा मायेचा धागा सीमेवर देशरक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व आणि जवानांच्या त्यागाची जाणीव प्रत्यक्ष अनुभवता आली. याप्रसंगी प्राचार्य दीपक चव्हाण, पर्यवेक्षिका संगीता गांगुर्डे, मुख्याध्यापक सुदर्शन जाधव, उपशिक्षिका स्वाती घोटेकर, जयश्री गांगुर्डे, सोनाली उन्हवणे, आशा सोनवणे, नीतेश राऊत, अंकुश बोराडे, स्वाती वरे, सविता बोराडे, धनंजय कोल्हे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी | चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त ‘राखी बनवा कार्यशाळा’ उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी सुंदर राख्या तयार केल्या. या राख्या काश्मीर व लडाख येथे देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवून त्यांच्याप्रती अनोखा आदर व्यक्त करण्यात आला. विद्यालयामध्ये कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कागद, कापड, रंगीत मणी आणि इतर शोभेच्या वस्तू वापरून आपल्या कल्पकतेतून आकर्षक राख्या बनवल्या. सीमेवर तैनात असलेल्या शौर्यवान सैनिकांना वंदन करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशाच्या सैनिकांप्रती अभिमान निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशसेवा बजावणारे शुभम खुटे, अभिषेक वाळके व इंजिनिअर रेजिमेंटचे वैभव जाधव या सैनिकांचा विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील व एनसीसी ऑफिसर राजेश चव्हाण यांच्या हस्ते या जवानांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका ललिता कर्नावट आणि इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्वराली दिवटे यांनी उपस्थित सैनिकांना प्रत्यक्ष राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय रायफल्सचे अभिषेक वाळके, इंजिनिअर रेजिमेंटचे वैभव जाधव आणि प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योगेश जाधव यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *