Headlines

सप्तशृंगीनगरात बिबट्याची दहशत‎:वणी परिसरातील घटनास्थळी पावलांचे ठसे, वन विभागाकडून पाहणी




शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळून आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सप्तशृंगीनगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकत होते. काही वेळाने त्यांचा आवाज अचानक बंद झाला. सकाळी रहिवाशांनी पाहणी केली असता, दररोज परिसरात दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचे निदर्शनास आले. इतर कुत्रीही भयभीत होऊन लपून बसल्याचे दिसून आले. परिसरातील गणेश देशमुख, मनोज खांडवी व राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाल्याचे सांगितले. अनिल राठोड यांच्या पाळीव कुत्र्यालाही बिबट्याची चाहूल लागल्याने ते लपून बसल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील तीन ते चार कुत्री गायब असल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, परिसरातील रस्त्यावर बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. घटनेची माहिती दिंडोरीचे आरएफओ सुशांत पाटील यांना देण्यात आली. त्यांनी वनपाल सुनील पवार यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी चर्चा केली. पाहणीदरम्यान बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *