![]()
भगवंताची अंतःकरणापासून भक्ती करणारे आणि वारकरी संतांचा ध्यास बाळगणाऱ्या वैष्णवांची भेट म्हणजेच आयुष्याचे सार्थक होय. अशा संतजनांच्या आलिंगनाने मानवी जन्म सुफळ होतो. कीर्तन सप्ताहाने आपापसातील मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो, असा उपदेश ह.भ.प. गुरुदेव महाराज यांनी केला. मानूर येथे कीर्तन सप्ताहात, दादाजी जगन्नाथ बोरसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष कीर्तनसेवेत ते बोलत होते. मंगळवारची कीर्तनसेवा सरस्वती बोरसे व हिरामण पवार यांच्यातर्फे करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या “माझिये जातीचे मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥’ या अभंगावर त्यांनी विस्तृत निरूपण केले. अभंगाचा अर्थ स्पष्ट करताना गुरुदेव महाराजांनी सांगितले की, संत तुकाराम महाराज म्हणतात की, मला माझ्याच जातीची (हरिभक्तांची) व्यक्ती भेटू दे, जेणेकरून माझ्या मनातील भक्तीची तहान भागवता येईल. ज्यांच्या अंतःकरणात हरीविषयी खरी ओढ आहे, अशाच साधू-संतांच्या भेटीची माझे मन आतुरतेने वाट पाहत असते. अशा भक्तांच्या विरहाने जीव कासावीस होऊन डोळे त्यांच्या आगमनाची वाट पाहतात. जेव्हा अशा वैष्णवांची भेट होऊन त्यांना आलिंगन दिले जाते, तेव्हाच खऱ्या अर्थाने हा मानवी जन्म धन्य होतो.
Source link
कीर्तन सप्ताहाने मतभेद विसरून धर्म मंडपात अवघा रंग एक होतो:मानूरला संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुरूदेव महाराजांचा उपदेश