![]()
श्रीरामपूर शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पुढील काळात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. धनगरवाडी येथे आयोजित योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जगातील काही देशांमध्ये परकीय आक्रमणे झाली. त्यामुळे त्या देशाची संस्कृती, विचार बदलले. मात्र या उलट आपल्या देशावर आक्रमणे करून किल्ले जिंकले, मंदिरे तोडली मात्र आपला अध्यात्माचा आणि संस्कृतीचा विचार कोणी तोडू शकले नाही. हरिनामात दुःखाचे हरण होऊ शकते, अशी ताकद असल्याचे त्यांनी म्हटले. या सोहळ्यास महंत रामगिरीजी महाराज, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आशुतोष काळे आदींची उपस्थिती होती. वंदे मातरम् गीताच्या समूह गायनाबद्दल महंत रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. सोनियाचा दिन आज उगवला या अभंगाच्या तालावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहबे थोरात आदींसह उपस्थित मान्यवरांनी फुगडी खेळली. शेवटी सप्ताह सांगता सोहळ्यात लाखो भाविकांनी एकाच वेळी वंदे मातरम् गायले. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. बळीराजाला केंद्रस्थानी ठेऊन निर्णय : शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार संतांच्या आशीर्वादाने आलेले असून बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जात आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने “नमो शेतकरी सन्मान योजना’ सुरू केली आहे. तसेच कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य घटकांसाठी सुरू केलेल्या या योजना कधीही बंद होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. लाखो भाविकांना घेतला महाप्रसाद लाखो भाविकांसाठी ५०० पोते साखरेची बुंदी प्रसाद वाटपासाठी ३५० ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. तर १५ हजार स्वयंसेवक नियुक्त होते. बुंदी तयार करण्यासाठी ३५ कढया, काल्याच्या प्रसादासाठी ७०० पोते मुरमुरे, २० क्विंटल शेंगदाणा, चिवडा बनवण्यासाठी आरएमसी मिक्सर ट्रक तैनात केला होता. स्वच्छतेसाठी येवला परिसरातील ४०० स्वयंसेवक कार्यरत होते. भटारखान्यात ४०० मजुरांनी दररोज १० ते १२ तास काम केले. रोज ५ लाख लिटर आमटी आणि भाकरीचा प्रसाद भाविकांना दिला गेला.
Source link
शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा