![]()
जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) अग्नितांडवप्रकरणी थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोंडे यांनी मंगळवारी २५ ऑगस्टला माध्यमांशी संवाद स
.
सोमवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हॅन्टिलेटरला आग लागल्यामुळे तीन निष्पाप बालकांचा मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने दुपारी माध्यमांशी संवाद साधला. पातोंडे म्हणाले, तीन लहान निष्पाप बाळांचा मृत्यू हा साधारण मृत्यू नाही, तर हे शासन, प्रशासनाने घेतलेले बळी आहेत. दरम्यान सरकारी रुग्णालयातील अनागोंदी किंवा संबंधितांच्या कर्तव्यात दुर्लक्ष यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून आरोग्यमंत्री जबाबदार आहेत, त्यामुळे पोलिसांनी त्यांनाच दोषी मानून त्यांचेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या अपघातानंतर आबीटकर यांनी सोमवारी रुग्णालयाला भेट दिली. परंतु त्यांनी या जबाबदारीबद्दल अवाक्षरही काढले नाही, याकडेही पातोंडे यांनी लक्ष वेधले. भंडारा येथील घटनेचा उल्लेख करीत त्यांनी व्हॅन्टिलेटरची पुरवठादार कंपनी ‘सीलर’बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्यामते ही कंपनी सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवर उपलब्ध नाही. तरीही त्या कंपनीकडूनच व्हॅन्टिलेटरची खरेदी करण्यात आल्याचा संशय असल्याचे ते म्हणाले. पातोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही इ-मेल ने नोंदविली आहे.
एवढेच नव्हे तर सीएमओ कार्यालयाने या मागणीचे निवेदन संबंधित यंत्रणेकडे पाठविल्याचेही स्पष्ट केले. त्यानुसार वंचितची चमू आजच येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत असल्याचे आणि गरज भासल्यास येत्या काळात याच मुद्द्याला धरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जाणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा निरीक्षक डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश पदाधिकारी विजय चोरपगार, दोन्ही जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी रमेश आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.
उदबत्त्या पेटवल्यानेही बंद व्हायचा अलार्म ! व्हॅन्टिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवेळी अलार्म वाजला नाही. अलार्ममुळे लगेच धापवळ करुन रेस्क्यू यंत्रणा ताबडतोब कामाला लागली असती. परंतु तसे झालेच नाही. याबाबत दबक्या आवाजात अशी चर्चा ऐकायला मिळाली की ते कदाचित कायमचे बंद करुन ठेवण्यात आले असावे. यासंदर्भात दिले जाणारे कारणही फारच रंजक आहे. मुळात उदबत्त्या पेटवल्या तर त्यातून निघणाऱ्या धुरानेदेखील अलार्म वाजायचा. कदाचित तसे होऊ नये म्हणून ते कायमस्वरुपी बंद करुन ठेवले असावे.