![]()
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकींच्या नोंदणी प्रक्रियेला गेल्या तीन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. ‘एमएच-12 झेडझेड’ ही वाहन नोंदणी मालिका पूर्ण झाली असून, आता ‘एमएच- 61बी’ ही मालिका केवळ पसंती क्रमांकांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे नियमित क्रमांकाची प्रतीक्षा असलेल्या दुचाकी चालकांना नव्या दुचाकीच्या नोंदणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘एमएच- 12 ‘ मालिकेतील पुढील क्रमांक सुरू ठेवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे कळवले होते. त्यानंतर पुण्यासाठी ‘एमएच-61’ ही स्वतंत्र मालिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अधिसूचना जारी करण्यात आली असून, एनआयसीवरील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून ‘एमएच-61 बी’ मालिकेतील पसंती क्रमांकाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘एमएच-61 बी’ मालिकेतील पसंती क्रमांकाची ही प्रक्रिया 31ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, सध्या ऑनलाइन पद्धतीने नियमित क्रमांक आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांना नवीन नियमित मालिका सुरू झाल्यानंतरच वाहन खरेदी आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ‘एमएच-61’ ही नियमित वाहनांसाठीची मालिका सुरू होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो. सध्या परिवहन विभागाकडून पसंती क्रमांकांसाठी अर्ज मागवून त्यांची छाननी केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 सप्टेंबरपासून ‘एमएच-61’ मालिका नियमित वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दुचाकी नोंदणी आणखी काही दिवस रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी, पुणे आरटीओने एमएच 61 मालिका पसंती क्रमांक साठी सुरू केलेली असून नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी देखील पसंती क्रमांक अर्ज स्वीकारले जाणार आहेत अशी माहिती दिली.
Source link
पुणे आरटीओमध्ये दुचाकी नोंदणी तीन दिवसांपासून थांबली:‘एमएच-61 बी’ पसंती क्रमांक सुरू, नियमितसाठी प्रतीक्षा