Headlines

शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळून खाक:शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान




तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे बुधवारी सकाळी वीज वितरण वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून ६ एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा ३ एकर, रामनाथ पाचपुते यांचा २ एकर व जगन्नाथ देशमुख यांचा १ एकर अशा एकूण ६ एकर क्षेत्रावरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उंचखडक बुद्रुक गावाच्या हद्दीत सकाळपासूनच जोराचा वारा वाहत होता. या परिस्थितीत शेता शेजारून गेलेल्या वीज वाहिनीचे शॉर्टसर्किट होऊन ठिणगी शेतातील उभ्या उसावर पडली आणि काही क्षणातच आगीने संपूर्ण फडाला वेढले. आग विझविण्यासाठी नागरिक व शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. मात्र, गावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यातच शेतातील उभा ऊस डोळ्यासमोर जळून गेल्याने बाधित शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, या घटनेची अगस्ति साखर कारखाना, कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *