![]()
डॉ. मकरंद वेलणकर यांच्या पीएचडी संशोधनातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. बुद्धिबळ हा केवळ एक स्पर्धात्मक खेळ नसून किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे या संशोधनाने अधोरेखित केले आहे. त्यांचे हे संशोधन ‘किशोरवयीन मुलांचा आत्मविश्वास आणि सारासार विचार करण्याची क्षमता यावर बुद्धिबळ प्रशिक्षणाचा होणारा परिणाम – एक वर्णनात्मक अभ्यास’ या विषयावर श्री बालाजी विद्यापीठ, पुणे येथे पूर्ण झाले असून, डॉ. रश्मी महाजन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या संशोधनामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या व्याख्येनुसार १० ते १९ वर्षे वयोगटातील ६१२ विद्यार्थी आणि ४७८ पालकांचा सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून माहिती संकलित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अनुभवांसोबतच पालकांच्या निरीक्षणांनाही संशोधनात महत्त्व देण्यात आले. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचे लिंग, बुद्धिबळ खेळण्याचा कालावधी आणि प्रशिक्षणाची पद्धत या घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला. संशोधनातील निष्कर्षांनुसार, एक वर्षापेक्षा कमी काळ बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत एक ते तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ नियमित बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक-भावनिक थकवा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले. मित्र, नातेवाईक किंवा सामाजिक माध्यमांद्वारे अनौपचारिकरीत्या बुद्धिबळ शिकणाऱ्यांच्या तुलनेत प्रशिक्षित मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धिबळ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य अधिक असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले. पालकांच्या मतांच्या विश्लेषणातूनही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. नियमित आणि दीर्घकाळ बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता कमी होत असून, धोरणात्मक विचार, सारासार निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, अंदाज बांधण्याची क्षमता आणि आत्मविश्वास अधिक प्रभावीपणे विकसित होत असल्याचे पालकांनी नमूद केले. विद्यार्थी जितका अधिक काळ बुद्धिबळाशी जोडला जातो, तितक्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक गुण वृद्धिंगत होत असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. डॉ. वेलणकर यांनी यापूर्वी एम.फिल. करताना ‘बुद्धिबळाचा कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले होते. त्या संशोधनातील सकारात्मक निष्कर्षांमुळे बुद्धिबळाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील भूमिकेचा अधिक व्यापक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पीएचडीचा विषय निवडला. हा संपूर्ण प्रबंध मराठी भाषेत सादर करण्यात आला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्वसामान्य पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत बुद्धिबळाचे विकासात्मक महत्त्व पोहोचेल.
Source link
बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य वाढते:डॉ. वेलणकर यांच्या संशोधनातून निष्कर्ष; व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम