Headlines

एमपीएससीने परीक्षांचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे:पेपरफुटीसाठी गोपनीय हेल्पलाइनची सूचना; डॉ. गोऱ्हे यांचा पाठपुरावा




शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर ठोस पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे काही प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता संबंधित मंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि उच्च शिक्षण विभागाकडे त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव किरण साळी, योगेश बेंद्रे आणि अनिराज कुरळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘युवांचा आवाज, शिवसेना लोकप्रतिनिधींसोबत संवाद’ हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी आणि संशोधकांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी एमपीएससीने आगामी परीक्षांचे निश्चित आणि समन्वित वेळापत्रक आधीच जाहीर करावे, अशी मागणी केली. एकाच दिवशी अनेक परीक्षा होणार नाहीत याची काळजी घ्यावी, परीक्षा शक्यतो ऑफलाइन घ्याव्यात आणि निकाल वेळेत घोषित करावेत, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या तक्रारींना प्रत्यक्ष प्रतिसाद देण्यासाठी एमपीएससीने नियमित ‘लोकशाही दिन’ व परस्परसंवादी मंच सुरू करावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. विशिष्ट विषयाशी संबंधित पदांसाठी ‘कोणत्याही शाखेची पदवी’ अशी पात्रता केल्याने संबंधित विषयाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. यासंदर्भातील समितीचा अहवाल आणि शासन निर्णयाची माहिती घेऊन एमपीएससी तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. पेपरफुटीची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवणारी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. अशा प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पथक अथवा अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्ह तांत्रिक संस्थांची मदत घ्यावी, अशीही त्यांची सूचना होती. टीसीएस तसेच काही व्यवस्था प्रत्येक परीक्षेसाठी एक हजार ते बाराशे रुपये शुल्क आकारत असल्याने विद्यार्थ्यांवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे एकदाच नोंदणी शुल्क, सामायिक स्मार्ट कार्ड किंवा वार्षिक नोंदणीची व्यवस्था करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शुल्क सवलत आणि शिष्यवृत्ती देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठातील मेस व कॅन्टीनमधील निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेच्या तक्रारींवर डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. कॅन्टीन व्यवस्थापन समितीत विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना त्यांनी केली. साप्ताहिक मेनू, स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्यासाठी नियमावली तयार करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *