Headlines

नागपूर मनपा स्वास्थ्य निरीक्षकाला लाचखोरी प्रकरणी सश्रम कारावास:जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा; लाचखोरांना मोठा दणका




नागपूर महानगरपालिकेच्या एका स्वास्थ्य निरीक्षकाला लाचखोरी प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या या खटल्यात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. प्रभाग क्रमांक ३२ मधील एका सफाई कर्मचाऱ्याचा पगार काढण्यासाठी आरोपी स्वास्थ्य निरीक्षक खिलावन गणू राम लांजेवार याने चार हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित सफाई कर्मचारी कामावर गैरहजर असल्याने तिच्या पगाराची प्रक्रिया थांबली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदार महिलेने २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे एसीबीने कारवाई करत सापळा रचला. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकारात आरोपी लांजेवार याने पंचांसमक्ष तीन हजार रुपये लाच स्वीकारली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, तपास अधिकारी आणि सक्षम अधिकारी असे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या बळावर न्यायालयाने आरोपी खिलावन लांजेवार याला दोषी ठरवले. न्यायालयाने लांजेवारला कलम ७ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावास) तसेच कलम १३(१)(ड) अन्वये चार वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावास) अशी शिक्षा ठोठावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *