![]()
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. आरोपीला तात्काळ शिक्षा मिळावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शबरी घरकुल योजनेतून तातडीने घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पिंपळवंडीतील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्क दिवे बसवण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. पिंपळवंडी वस्तीमध्ये जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील, अशी माहितीही पवार यांनी दिली. पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, महिला व बालविकास आयुक्त वर्षा वंटवाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, मनोधैर्य योजनेतून दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन समितीने या मदतीला मंजुरी दिली असून, दहा लाख रुपयांची रक्कम आजच पीडित कुटुंबाच्या खात्यावर जमा केली जाईल.
Source link
पिंपळवंडी बालिका अत्याचार प्रकरण:सुनेत्रा पवारांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट, आरोपीवर कठोर कारवाईसह फास्ट ट्रॅक खटल्याचे आदेश