Headlines

विद्यार्थ्याच्या खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स; आडसूळ शाळेतील प्रकार:मुख्याध्यापकांचे ‘चूक झाली, पुन्हा होणार नाही’चे आश्वासन‎




तालुक्यातील आडसूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्या खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स देऊन ते वाहून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हायरल व्हिडिओत आडसूळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवले जाते; मात्र त्यांच्या खांद्यावर शाळेचे साहित्य अथवा बिस्किटांचे बॉक्स देऊन ते वाहून नेण्याची वेळ का आली, असा सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. हे बिस्किट विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासाठी गावातील दुकानातून बिस्किटे घेतल्याचे समजते. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रहार संघटनेचे गौरव पाटील अरबट यांनी गुरुवारी तेल्हारा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत जिल्हा परिषद शाळा आडसूळ येथील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांच्यावर विद्यार्थ्याकडून बॉक्स वाहून नेण्यास लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत विद्यार्थ्यांच्या कल्याणाची व सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापकांकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसून न आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याकडून अशा प्रकारची कामे करून घेतली जाणार नाहीत, यासाठी कडक आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थी हे ज्ञानाचे वाहक आहेत; ओझे वाहणारे मजूर नव्हेत. त्यामुळे तक्रार आणि संबंधितांचे जबाब आदींची निःपक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई आणि उपाययोजना होणार का, याकडे आडसूळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. निवेदनाची प्रत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि तेल्हारा गटशिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रकारात नेमकी जबाबदारी कोणाची, विद्यार्थ्यांकडून असे काम का करून घेण्यात आले आणि भविष्यात अशी घटना होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार, याचे उत्तर शिक्षण विभागाने देण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांमधून होत आहे. शाळा ही विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि सुरक्षित वातावरण देणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असावीत, त्यांच्या खांद्यावर शिक्षणाची बॅग असावी; मात्र बिस्किटाचा बॉक्स वाहून नेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असेल, तर हा प्रकार निश्चितच गंभीर आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात व्हिडीओ समोर आला असून लेखी तक्रारही दाखल झाली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने केवळ आश्वासनावर प्रकरण संपवण्याऐवजी प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी की ओझे वाहण्यासाठी? तक्रार प्राप्त; केंद्र प्रमुखांद्वारे चौकशी करण्यात येणार ^माझ्याकडे विद्यार्थ्यांकडून बिस्किटाचा बॉक्स वाहून नेल्याचा व्हिडिओ आलेला नाही. या प्रकाराबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची केंद्रप्रमुखांमार्फत चौकशी करुन जबाबदारी निश्चित करण्यात येईल. – सुनीता बकाल, गटशिक्षणाधिकारी, पं. सं. तेल्हारा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *