Headlines

पुढची लढाई जिंकायची आहे म्हणून तूर्तास थांबायला हवं:समाजवादी नेते कपिल पाटील यांचं आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन




राज्यातील आदिवासी विद्यार्थी आपल्या रास्त आणि न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पुण्यापासून तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या मांजरी येथील शासकीय वसतिगृहात चार विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अस्वस्थ व्हायला यासाठी होतं कारण आज या उपोषणाचा 16 वा दिवस आहे, असे कपिल पाटील म्हणाले. पुढे बोलताना कपिल पाटील म्हणाले, आनंद यासाठी आहे की, आंबेडकरी चळवळीत पाहिलेली धार आज प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पाहतो आहे. विद्यार्थी आणि त्यांचे नेते अत्यंत आक्रमक, जिद्दी आहेत; पण त्याच वेळी त्यांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण आणि भाषा तितकीच संयत आहे. कुठेही असभ्य वर्तन किंवा आक्षेपार्ह भाषा नाही. हे कौतुकास्पद आहे. काळूराम काका धोदडे यांच्यासोबत मी राहिलो आहे. काळूराम काकांच्या नेतृत्वाखाली आदिवासी एकता परिषदेने आदिवासींची नवी अस्मिता जागी केली. तरुण पिढीचा वैचारिक विकास राजेंद्र गावीत आणि के. सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 45 वर्षांपूर्वी जेव्हा आदिवासी विद्यार्थी संघटनेची आंदोलनं झाली, तेव्हा त्यांनी बरंच काही मिळवून दिलं; परंतु आजच्या या आंदोलनात एक मोठा फरक आहे. हे तरुण अभ्यासात, मेहनतीत आणि वैचारिक मांडणीत फार पुढे गेले आहेत, असे कपिल पाटील म्हणाले. जयपाल सिंह मुंडा: विद्यार्थ्यांची नवी ओळख पूर्वी वसतिगृहांमध्ये जयपाल सिंह मुंडा यांचा फोटो नसायचा. बिरसा मुंडा यांचा जरूर होता. जयपाल सिंह मुंडा हे भारतीय हॉकी संघाचे पहिले ऑलिम्पिक कर्णधार होते. ज्यांच्या नेतृत्वात भारताने 1928 मध्ये सुवर्णपदक जिंकले. ते ऑक्सफर्डचे ग्रॅज्युएट होते. ICS होते. संविधान सभेचे सदस्य होते. आदिवासींची ओळख, अस्तित्व आणि हक्क यांना राज्यघटनेत आकार देण्याचे श्रेय जयपाल सिंह मुंडा यांना जातं. गेल्या अनेक दशकांत केंद्रात सत्तेवर आलेल्या कोणत्याच सरकारने त्यांचा उचित सन्मान केला नाही. (खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळण्यासाठी व्ही. पी. सिंग यांचं सरकार यावं लागलं.) जयपाल सिंह मुंडा या विद्यार्थ्यांची नवी ओळख आहे, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली. वसतिगृहांमधील सुविधांचा दुजाभाव वसतिगृहातले विद्यार्थी ही आदिवासी समाजाची एकमेव आशा आहे. पण त्यांच्या मागण्यांची दाद गेल्या अनेक वर्षांत लागली नाही. त्यांना सन्मान मिळाला नाही. सामाजिक न्याय विभागाच्या (प्रामुख्याने दलित विद्यार्थ्यांच्या) वसतिगृहांची स्थिती आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांची स्थिती यात मोठी तफावत आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची संघटित ताकद आणि जागरूकता यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे सुतासारखी सरळ चालतात. साधा फरक सांगतो सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दररोज दोन उकडलेली अंडी, फळं, आठवड्यातून दोनदा मटण/चिकन (250 ग्रॅम) आणि दररोज 250 मिली दूध मिळतं. याविपरीत, आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना रोज केवळ एकच अंड मिळतं, आठवड्यातून फक्त एकदा 200 ग्रॅम चिकन/मटण मिळते आणि अंडी न खाणाऱ्यांना केवळ बिस्किटांचा पुडा दिला जातो. हा फरक कुणी केला? कपिल पाटील यांनी सांगितले की, गेली 12 – 13 वर्ष हे सुरु आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांचा काळातला हा शासन निर्णय आहे. 10 एप्रिल 2013. त्यांनी हा आहार कमी का केला, कळत नाही. पण त्यानंतर आलेल्या कोणत्याच सरकारने यात दुरुस्ती केली नाही. दोष सगळ्याच सरकारांचा आहे. पुढचे सगळे जीआर कॉपी-पेस्ट करून काढले जात होते. मुलांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही जो जीआर निघाला तोही कॉपी-पेस्ट करून. त्यामुळे पुण्याची मुलं थेट उपोषणालाच बसली. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना वयाची अट नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना मात्र अट. 14 ऑगस्ट 2026 चा हा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता रद्द केला आहे. सुधारित निर्णय विद्यार्थ्यांशी बोलून सरकार करणार आहे. नोकऱ्यांमधील अतिक्रमणाचा कळीचा मुद्दा मुख्य मुद्दा आहे तो प्रत्येक वसतिगृहात मेस सुरु करण्याचा. वसतिगृह मध्यवर्ती ठिकाणी आणण्याचा. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्याला तयारी दाखवली आहे. पण या सर्वांहून कळीचा मुद्दा आहे, तो सरकारी नोकऱ्यांमधील आदिवासींच्या जागांवर झालेल्या अतिक्रमणाचा. शिकून बाहेर पडल्यानंतरही खोटं प्रमाणपत्र बनवून आदिवासी मुलांच्या नोकऱ्या बळकावल्या जात असतील तर आदिवासी मुलांच्या भविष्याचं काय? असा सवाल कपिल पाटील यांनी उपस्थित केला. सरकारची सकारात्मक पावले आणि आंदोलनाचा विजय रोहित ढालेने मला या उपोषणाची माहिती 20 ऑगस्ट रोजी दिली तेव्हा आठवा दिवस होता. दुसऱ्याच दिवशी मी मांजरी येथे गेलो. तेथूनच मी मुख्यमंत्र्यांना टेक्स्ट मेसेज पाठवला. मी तिथे मुलांशी बोलत असताना, तो मेसेज पाहून मुख्यमंत्र्यांनी दोनदा कॉल केला. परिस्थितीचं गांभीर्य त्यांना लक्षात आणून दिल्यावर आदिवासी विकास मंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिलं. आदिवासी विकास मंत्री तेव्हा दुर्गम भागात होते. त्यांना मी नागपूरला जाऊन परिस्थिती सांगितली. सोमवारी बैठकही झाली. पण मुख्य मुद्दयाला हात घातला गेला नव्हता. त्यानंतर मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. 12,500 पदे तत्काळ भरण्याचं नुसतं आश्वासन दिलं नाही तर 12 तासांच्या आत तसा शासन आदेश काढला. आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. बोगस घुसखोरी रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त असलेली पदं भरायची आहेत. ती भरण्याची प्रक्रिया आता सुरू होईल. पण विद्यार्थ्यांचं इतक्यावर समाधान झालेलं नाही. ‘चतकोराने मला न सुख’ असं केशवसुत म्हणत. तर या मुलांनी का म्हणू नये ? केवळ आदिवासींच्याच नोकर्‍या नव्हेत तर मेडिकलसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात होणारी बिगर-आदिवासींची घुसखोरी थांबवण्याचा मुद्दा आहे. आणि तिथे बोगस आदिवासी घुसखोरी करणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्था करून ही प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. ती कालबद्ध वेळेत पूर्ण केली गेली पाहिजे. बोगस असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. या सगळ्याबद्दलची सुस्पष्टता विद्यार्थ्यांना हवी आहे. मुद्दा तांत्रिक आणि किचकट असला तरी तो महत्त्वाचा आहे. म्हणून खुद्द आदिवासी विकास मंत्री यांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली आहे. शासनाने ते लवकर मार्गी लावावं. आणि विद्यार्थ्यानी आता अधिक न ताणता याबद्दलची लेखी सुस्पष्टता शासनाकडून आल्याबरोबर उपोषण मागे घ्यावं, असं माझं त्यांना आवाहन आहे. कारण 16 दिवस झाले आहेत. उपोषण ताणलं गेलं तर या मुलांना पुढे अनेक शारीरिक त्रासांना सामोरे जावं लागेल. वेगळ्या वळणावर आंदोलन जाता कामा नये. उपोषणातून माघार घेण्याचे आवाहन हितसंबंधीयांनी आपला दुरूपयोगही करून घेता कामा नये. शासनाकडून अधिक काही मिळवून घेण्यासाठी आपली शक्ती राखूनही ठेवण्याची आवश्यकता आहे. खरं तर आजवरच्या सगळ्याच सरकारमधील राजकीय पक्षांनी आपल्या चुका मान्य केल्या पाहिजेत. ब्लेम गेम करण्यापेक्षा मुलांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मला खात्री आहे मा. मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री त्यांचं आश्वासन पाळतील. मुलांनीही आता उपोषण करणार्‍या सहकार्‍यांचा अंत पाहू नये. या शक्तीच्या आधारावर पुढची लढाई जिंकायची आहे. अजून बरंच काही मिळवायचं आहे. तेव्हा आता तूर्तास थांबायला हवं, असे कपिल पाटील यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *