![]()
नागपूर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आयसीआयसीआय बँकेतील २३ कोटी ३१ लाख रुपयांच्या गोल्ड लोन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे आणि खोटे कर्जदार उभे करून ही फसवणूक करण्यात आली होती. धंतोली पोलीस ठाण्यात ३० मार्च २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला बँकेचे २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते, मात्र सखोल तपासानंतर हा आकडा २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपयांवर पोहोचला. मनिष नगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन यासह विविध शाखांमध्ये हा घोटाळा पसरला होता. बँकेच्या नियमित आकडेवारी आणि नियतकालिक ऑडिट दरम्यान १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका गोल्ड लोन खात्यातील तारण दागिन्यांबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर, एकापाठोपाठ एक अशा तब्बल १५२ संशयास्पद गोल्ड लोन खात्यांची कसून तपासणी करण्यात आली, ज्यातून या घोटाळ्याचे बिंग फुटले. पोलिसांच्या तपासात सचिन राऊत हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या सचिन राऊतने २०१८-२०१९ मध्ये स्वतःच्या नावाने गोल्ड लोन घेऊन बँकेत विश्वासार्हता निर्माण केली होती. त्यानंतर त्याने बँक व्यवस्थापकांचे गोल्ड लोनचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्या मजुरांच्या नावावर बँक मॅनेजरच्या मदतीने बोगस गोल्ड लोन काढले. या गैरव्यवहारात बँक मॅनेजर पंकज केकतपुरे, दिनेश नागपुरे, आशिष वंजारी आणि उपव्यवस्थापक प्रकाश अवस्थी यांनी मुख्य आरोपीला विविध शाखांमधून सक्रिय मदत केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अप्रेझर/व्हॅल्युअर नदू खरवडे याची चार शाखांमध्ये नियुक्ती नसतानाही त्याला इतर शाखांमध्ये पाठवून १५५ बनावट सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करून घेतले गेले. यासाठी बँक मॅनेजर पंकज केकतपुरे हा प्रत्येक अहवालामागे नदू खरवडे यास ५ हजार रुपये देत होता. नदू खरवडे याने आपल्या ओळखीचे नातेवाईक आणि मित्रांचे मिळून ३८ बनावट ग्राहक बँकेला उभे करून दिले होते.
Source link
आयसीआयसीआय बँक गोल्ड लोन घोटाळा:23 कोटींची फसवणूक, नागपुरात मुख्य आरोपीसह 8 जणांना अटक