Headlines

दोन वेगवेगळ्या अपघातांत 8 जण जखमी:रक्षाबंधन अन् सालबर्डी प्रवासाला गालबोट




धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर ते पिंपळखुटा मार्गावर शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास एका भरधाव वाहनाने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ऑटोमधील पाच जण जखमी झाले आहेत. चिंचपूर येथील काही भाविक प्रवासी ऑटोने सालबर्डी यात्रेसाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांचा ऑटो अंजनसिंगी येथील शोभामाता मंदिराजवळून जात असताना, एका भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की ऑटोचे प्रचंड झाले आणि आतील पाचही प्रवासी जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखत, उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. सर्व पाचही गंभीर जखमींना प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी तातडीने अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दुसऱ्या घटनेत रक्षाबंधनासाठी नागपूरहून निघालेल्या कुटुंबाच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे नजीक घडलेल्या या अपघातात कारमधील ३ जण जखमी झाले असून, एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने पार्सल घेऊन जाणारा एक मालवाहू ट्रक समृद्धी महामार्गावरून जात होता. याच मार्गावरून नागपूरहून रक्षाबंधनानिमित्त निघालेल्या कोटेचा कुटुंबाची कार जात होती. धामणगाव रेल्वे जवळ आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या या कारने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *