![]()
पुण्यात विविध राजकीय पक्षांच्या युवक संघटनांच्या प्रतिनिधींनी शनिवारी हॉटेल वैशाली येथे अनौपचारिक नाश्ता भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून युवक संघटनांमध्ये निर्माण झालेले मतभेद, वाद आणि वाढलेली आक्रमकता यावर सकारात्मक संवाद साधणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी वैचारिक मतभेदांमुळे वैयक्तिक द्वेष निर्माण होऊ नये, यावर यावेळी एकमत झाले. या भेटीत उपस्थित युवक प्रतिनिधींनी सांगितले की, राजकारणात प्रत्येक पक्षाची विचारधारा आणि भूमिका वेगळी असते आणि त्या भविष्यातही वेगळ्याच राहतील. मात्र, राजकीय संघर्ष हा विचारांचा असावा, व्यक्तींचा नसावा. परस्परांमधील संवाद कायम राहिल्यास गैरसमज आणि अनावश्यक संघर्ष टाळता येऊ शकतात, यावरही चर्चा झाली. अलिकडच्या काळात विविध राजकीय युवक संघटनांमधील आरोप-प्रत्यारोप, आंदोलनांतील आक्रमकता आणि वैयक्तिक पातळीवरील वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मतभेद असले तरी लोकशाही मूल्ये, संवाद आणि परस्पर सन्मान जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या अनौपचारिक भेटीस युवक काँग्रेसचे अक्षय जैन, सौरभ आमराळे, भुषण रानभरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे नगरसेविका निवेदिता एकबोटे व दुष्यंत मोहोळ, युवासेनेचे किरण साळी, मनवीसेचे धनंजय दळवी, राष्ट्रवादी (शप) युवतीच्या मनाली भिलारे, युवासेनेचे (उबाठा) राम थरकुडे व परेश खांडके, राष्ट्रवादी (अप)च्या लावण्या शिंदे, राष्ट्रवादी (शप) युवकचे किशोर कांबळे व अजिंक्य पालकर तसेच वंदे मातरमचे लेशपाल जवळगे आदी उपस्थित होते. राजकीय स्पर्धा आणि संघर्ष तीव्र असला तरी तो वैचारिक पातळीवरच राहावा आणि व्यक्तिगत संबंधांमध्ये कटुता येऊ नये, असा सकारात्मक संदेश या सर्वपक्षीय युवकांच्या अनौपचारिक भेटीतून देण्यात आला.
Source link
पुण्यात सर्वपक्षीय युवक संघटनांच्या प्रतिनिधींची अनौपचारिक भेट:राजकीय मतभेद कायम ठेवून वैयक्तिक द्वेष टाळण्यावर चर्चा