![]()
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या या दरबाराचा संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल चार तास परिसराची कसून झाडाझडती घेत सविस्तर स्पॉट पंचनामा केला. यावेळी दरबारात भक्तांना दिल्या जाणाऱ्या विविध संशयास्पद औषधांचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले असून, या धडक कारवाईने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गडगेच्या या कथित दरबारामागील आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचे जाळे उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडच्या तरुणाकडून 22 हजार रुपये उकळले अहिल्यानगरमधील संगमनेरचा तथाकथित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या कारनाम्यांची व्याप्ती आता राज्याच्या इतर भागांतही पसरल्याचे उघड झाले असून, बीडमधील एका तरुणाची फसवणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. पोटाचा आजार बरा करणे आणि विवाह जमवून देण्याच्या नावाखाली या भोंदूने माजलगाव येथील एका तरुणाकडून तब्बल 22 हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने या भोंदू विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ या नावाने दरबार भरवून मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करणाऱ्या या भोंदूला पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन तक्रार दिल्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सध्या पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्या दरबारातील संशयास्पद व्यवहारांची आणि फसवणुकीच्या जाळ्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. कॅन्सरसारखे आजार मंत्रोच्चाराने बरे केल्याचा दावा राजेंद्र गडगे आपल्या ‘दत्तधाम सरकार’ दरबारात कॅन्सर, सांधेदुखी आणि मणक्याच्या त्रासासारखे गंभीर आजार केवळ मंत्रांच्या जोरावर बरे केल्याचे बनावट दावे करत असे. या कथित चमत्कारांचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून तो ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या नागरिकांना जाळ्यात ओढायचा. व्यवसायातील नुकसान भरून काढण्याचे आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून तो लोकांच्या अज्ञानाचा आर्थिक फायदा घेत असल्याचे आता समोर येत असून, कोठडीदरम्यान त्याचे आणखी अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.
Source link
भोंदू राजेंद्र गडगेच्या 'दत्तधाम दरबार'वर पोलिसांची कारवाई:स्पॉट पंचनामा करत विविध औषधी जप्त; बीडच्या तरुणाची फसवणूक केल्याचे उघड