Headlines

पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका!:जमिनीत ओलावा टिकवण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन‎




जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने अचानक ओढ दिल्याने खरीप पिकांवर ताण निर्माण झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचे नियोजन, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि किडी-रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल. ‘‘पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका; उपलब्ध ओलावा जपा आणि पिकाला ताणातून बाहेर काढा, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक एस. एस. आणि विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी दिला. दीर्घकाळ पाऊस न झाल्याने कोरडे व उष्ण वातावरण निर्माण झाले असून पिकांची वाढ खुंटणे, पाने सुकणे तसेच किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ऊस पिकात हुमणी, पांढरी माशी व पायरीला, तर कापसात रसशोषक किडींचा धोका वाढू शकतो. ऊस उत्पादकांनी उपलब्धतेनुसार ठिबक किंवा एक आड एक सरी पद्धतीने सिंचन करावे. पाचट न जाळता दोन ओळींत पसरवून आच्छादन करावे. कापसात जमिनीला भेगा पडू नयेत यासाठी हलकी कोळपणी करावी. सोयाबीनमध्ये फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन करावे. तुरीतही आच्छादन करून ओलावा टिकवावा. डॉ. शामसुंदर कौशिक कृषी विज्ञान केंद्राचे हेमहत्त्वाचे ‘चार मंत्र’ संरक्षित सिंचन करा; पाचट-तण जाळू नका, आच्छादन करा; कोरड्या जमिनीत नत्रयुक्त खते देऊ नका; किडींचा प्रादुर्भाव दिसताच आर्थिक नुकसान पातळी तपासूनच फवारणी करा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *