- Marathi News
- National
- Congress Committed Infanticide Of The Bill In Front Of The Country Prime Minister Modi, Said, I Will Remove The Obstacle Of Reservation…
नवी दिल्ली16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पडल्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री ८:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. २९ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले- ‘काँग्रेसने संपूर्ण देशासमोर विधेयकाची भ्रूणहत्या केली. महिलांची स्वप्ने ‘निर्दयीपणे चिरडली’ गेली.
महिला आरक्षण विधेयक हा सरकारचा ‘प्रामाणिक प्रयत्न’ होता, ज्याला द्रमुक व काँग्रेसने रुळावरून उतरवले. मी देशातील माता-भगिनींची माफी मागतो.’ त्यांनी तामिळनाडूतील महिलांना आवाहन केले की त्यांनी द्रमुकला विचारावे की, त्यांनी त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या विधेयकाला विरोध का केला? त्यांनी लोकांना २३ एप्रिलला (मतदानाच्या दिवशी) त्यांना कठोर संदेश देण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘विधेयक पडल्यानंतर काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष उत्सव साजरा करत होते. ज्या लोकांनी हे पाप केले आहे, त्यांना त्याची शिक्षा नक्की मिळेल. संपूर्ण देशासोबत मीही दुःखी आहे. मी महिला आरक्षणातील प्रत्येक अडथळा दूर करूनच राहीन. काँग्रेस हा एक सुधारणाविरोधी पक्ष आहे, जो नेहमी सुधारणेला विरोध करतो. विरोधक नारीशक्तीला गृहीत धरत आहेत.’
पंतप्रधान म्हणाले, ‘तृणमूल काँग्रेस, सपा आणि काँग्रेस हे तिन्ही महिला विरोधी आहेत. ते देशाच्या नारीशक्तीला पुढे जाऊ देऊ इच्छित नाहीत. सपाने नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून लोहियाजींच्या आदर्शांना पायदळी तुडवले आहे. विरोधी पक्षांनी विधेयक पाडून आपल्या संविधानाचाही अपमान केला आहे.’
महिला सर्व काही विसरू शकते, पण अपमान नाही : मोदी
- मोदी म्हणाले, एक महिला सर्व काही विसरून जाते, पण स्वतःचा अपमान नाही. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेला हा अपमान प्रत्येक महिलेच्या हृदयात कायम राहील.
- काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि सपासारख्या पक्षांचे स्वार्थी राजकारण देशातील महिलांच्या जिवावर केले गेले आहे. त्यांनी विधिमंडळांमध्ये ३३% महिला आरक्षण देण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.
- विधेयकाचा उद्देश कोणाकडूनही काहीही न हिरावून घेता महिला सक्षमीकरणाला बळ देणे हा होता. मला आशा होती की काँग्रेस मागील चुका सुधारेल, पण त्यांनी नवा इतिहास रचण्याची संधी गमावली.
- परिवारवादी पक्ष महिलांनी पुढे जावे असे इच्छित नाहीत. कारण यामुळे त्यांचे स्वार्थी राजकारण संपुष्टात येऊ शकते. नारीशक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्ती ही काळाची गरज होती आणि उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेत संतुलित सक्षमीकरण सुनिश्चित करण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. ते हे विसरत आहेत की २१ व्या शतकातील नारी देशातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहे. ती त्यांचा हेतू ओळखत आहे. याची त्यांना नक्की शिक्षा मिळेल.
भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली…
महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पडल्यानंतर उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी शनिवारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संसदेत विधेयक पडणे आणि त्यानंतरच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. पक्ष नेतृत्वाने सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांमध्ये विधानसभेचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिवेशनांमध्ये विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध ‘निंदाव्यंजक प्रस्ताव’ मंजूर केला जाईल. यादरम्यान भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीविरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली आहेत. महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मोदी म्हणाले- मी देशातील महिलांची माफी मागतो राहुल म्हणाले- पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी महिला आरक्षणावर देशाला खोटे सांगितले. विधेयकाचा वापर देशाचा निवडणूक नकाशा पुन्हा बनवण्यासाठी परिसीमन लपवणारा मुखवटा म्हणून केला.